दिलासादायक ! आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 18:40 IST2020-08-29T18:28:28+5:302020-08-29T18:40:53+5:30
ग्रामविकास विभागाने २६ ऑगस्ट रोजी पत्र काढून वरील निर्देश दिले.

दिलासादायक ! आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांचा मार्ग मोकळा
औरंगाबाद : आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त व रुजू करण्यास हरकत नाही, असे पत्र ग्रामविकास विभागाने काढल्याने शिक्षकांचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भात शिक्षक सहकार संघटनेने पाठपुरावा केला होता.
आंतरजिल्हा बदलीचा चौथा टप्पा जाहीर झाल्यानंतर रिक्त पदी व साखळी बदल्या झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त व रुजू करुन घेण्याबाबत राज्यातील जवळपास १६ जिल्हा परिषदांनी स्पष्ट नकार दिला होता. याबाबत शिक्षक सहकार संघटनेचे राजाध्यक्ष संतोष पिट्टलवाड यांनी मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, ग्रामविकासचे मुख्य सचिव यांना १४ आणि २१ ऑगस्ट रोजी सविस्तर पत्र लिहून वरील बदल्या साखळी पद्धतीने झाल्या असल्याने बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त व रुजू करण्यास कोणतेही अडचण नाही. तसेच त्याचा कोणताच परिणाम बिंदुनामावलीवर होणार नसल्याची बाब शासनाच्या लक्षात आणून दिली होती.
या पत्राची दखल घेत ग्रामविकास विभागाने २६ ऑगस्ट रोजी पत्र काढून वरील निर्देश दिले. त्यामुळे बदली होऊनही कार्यमुक्ती किंवा रुजू होण्यात अडचण येत असलेल्या शिक्षकांचा मार्ग मोकळा झाला आहे. या पत्रकामुळे आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांची मोठी समस्या दूर झाली असल्याचे पिट्टलवाड यांनी ‘लोकमत’ला सांगितले.