केबिनमधून थेट वर्गात; कुलगुरू विजय फुलारी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र शिकवणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 19:17 IST2025-06-19T19:16:41+5:302025-06-19T19:17:40+5:30
१ जुलैपासून होणार तासिकांना सुरुवात, नित्याने तास घेण्याचे आदेश

केबिनमधून थेट वर्गात; कुलगुरू विजय फुलारी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र शिकवणार
छत्रपती संभाजीनगर : तुम्हाला जगात बदल घडवून आणायचा असेल, तर त्याची सुरुवात स्वत:पासून करा, असे महात्मा गांधींनी म्हटले होते. त्याची प्रचिती आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात येईल. कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी भौतिकशास्त्राच्या विद्यार्थ्यांना शिकविण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २ जुलैपासून प्रत्यक्ष अध्यापनास विद्यापीठात सुरुवात होणार आहे. त्यावेळी एक विषय कुलगुरू स्वत: शिकविणार आहेत. त्यानुसार वेळापत्रक बनविण्याच्या सूचना विभाप्रमुखांना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी एप्रिल-मे महिन्यात झालेल्या परीक्षांमध्ये विविध महाविद्यालयांतील केंद्रांना भेटी दिल्या, तेव्हा त्याठिकाणची दृश्ये पाहून कॉपीमुक्त परीक्षेची कडकपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी सुरुवातीला शैक्षणिक पद्धतीमध्ये बदल करण्याची गरज आहे. हा बदल स्वत: पासून घडवण्याचा विडाच जणू फुलारींनी उचलला आहे. अनेक महाविद्यालयांसह विद्यापीठातील काही विभागांमध्ये प्राध्यापक तासिकाच घेत नसल्याचे समोर आले आहे. त्यासाठी कुलगुरूंनी मोहीमच उघडली आहे. एकही विद्यार्थी आला, तरी त्यासाठी तास घेण्याची तंबी दिली. त्याचवेळी स्वत: भौतिकशास्त्राचे प्राध्यापक असल्यामुळे पहिल्या सत्राला एक विषय शिकविण्याचा निर्णय कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी घेतला आहे. त्यासाठी विद्यापीठातील भौतिकशास्त्राच्या विभागप्रमुखांना त्यानुसार वेळापत्रक बनविण्याच्या सूचना दिल्या आहेत. कुलगुरूंनीच वर्गावर जाऊन तास घेण्याचे ठरविल्यामुळे इतर प्राध्यापकांनाही तास घेणे बंधनकारक होणार आहे.
‘त्या’ प्राध्यापकांची यादी पोहचली
विद्यापीठातील अनेक विभागांत काही विशिष्ट प्राध्यापक वेळेवर येत नाहीत. विभागात आल्यानंतर तासिकांवर जात नाहीत. गेले तरी उशिरा जातात व लवकर निघून येतात. काही जण स्वत:कडे पीएच.डी. करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना वर्गावर पाठवितात. तसेच, विद्यार्थी कमी असल्यामुळे केबिनमध्येच बोलावून तास घेतात, अशा प्राध्यापकांची यादीच कुलगुरूंकडे पोहोचल्याचे समजते. त्यामुळे कुलगुरू कोणत्याही वेळी संबंधित प्राध्यापकांच्या वर्गांना अचानक भेटी देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
१ तास विद्यार्थ्यांना शिकविणार
आयुष्यभर भौतिकशास्त्राचे अध्यापन केले आहे. येत्या १ जुलै रोजी विभागातील तासिकांना सुरुवात होणार आहे. तेव्हा, एक विषय शिकवणार आहे. सकाळी ९ वाजताच कार्यालयात येतो. त्याठिकाणी एक तास काम केल्यानंतर १० वाजता भौतिकशास्त्र विभागात जाऊन विद्यार्थ्यांना शिकवणार. त्यानंतर विद्यापीठातील एक-दोन विभागांना अचानक भेटी देऊन पाहणी करीत पुन्हा ११:३० वाजता कार्यालयात परतण्याचे नियोजन केले आहे.
- डॉ. विजय फुलारी, कुलगुरू