छोटे पंढरपूरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 17:59 IST2019-07-12T17:55:36+5:302019-07-12T17:59:46+5:30
विठु नामाच्या जयघोषाने पंढरपूर दुमदुमले

छोटे पंढरपूरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी
वाळूज महानगर (औरंगाबाद ) : वाळूज महानगरातील छोट्या पंढरपूरात शुक्रवारी (दि.१२) आषाढी एकादशी यात्रे निमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी अलोट गर्दी केली होती. विठु माऊलीचा जयघोष व टाळ मृदंगाच्या गजरात येणाऱ्या वारकरी दिंड्यामुळे संपूर्ण पंढरपूर भक्ती सागरात बुडाले.
अत्यल्प पावसामुळे दुष्काळी परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळे भाविकांनी विठ्ठल चरणी लिन होऊन, चांगला पाऊस पडू दे असे भगवान विठ्ठलाला साकडे घातले. यावेळी भाविकांच्या विठु माऊलीच्या जयघोषाने अवघी पंढरपूर नगरी दणाणून गेली होती.
षाढी एकादशी यात्रेनिमित्त छोट्या पंढरपूरात दरवर्षी मोठी यात्रा भरते जवळपास ६ ते ७ लाख भाविक दरवर्षी विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असतात.
मध्यरात्री १२ वाजुन ५ मिनिटींनी विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात उद्योग राज्यमंत्री अतुल सावे व त्यांच्या पत्नी अंजली सावे यांच्या हस्ते महाभिषेक करण्यात आला. पहाटे ५ वाजता वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल गायकवाड व त्यांच्या पत्नी सुनंदा गायकवाड यांच्या हस्ते महाभिषेक व महाआरती करुन भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. यात्रेनिमित्त येथील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात भगवान विठ्ठलाच्या दर्शनासाठी वाळूज पंचक्रोशीसह औरंगाबाद, जालना, बीड, बुलढाणा, अहमदनगर, श्रीरामपूर आदी भागातून वारकरी दिंड्या व भाविकांचे जत्थे येत होते.