सावरगावात भरला भक्तीचा मळा
By Admin | Updated: August 8, 2016 00:40 IST2016-08-08T00:35:52+5:302016-08-08T00:40:31+5:30
तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील नागोबा यात्रेचा रविवारी अखेरचा दिवस. गण भाकणूक, पालखी मिरवणूक आदी विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साही वातावरणात

सावरगावात भरला भक्तीचा मळा
तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील नागोबा यात्रेचा रविवारी अखेरचा दिवस. गण भाकणूक, पालखी मिरवणूक आदी विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साही वातावरणात हजारो भाविकांच्या उपस्थितीत या यात्रेची सांगता झाली. लिंबाऱ्याच्या माळा गळ्यात घालून ‘नागनाथ महाराज की जय’ असा जयघोष करीत भाविकांनी या मिरवणुकीत सहभाग नोंदविला होता.
आषाढ अमावस्येपासून सावरगाव येथे नागोबा यात्रेला प्रारंभ झाला. सलग पाच दिवस साप-पाल-विंचू हे प्राणी एकत्रित राहतात हे या यात्रेचे खास वैशिष्ट्य आहे. त्यांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी होती. रविवारी दुपारी ३ वाजता पुजारी कल्याण स्वामी यांच्या घरापासून गण पालखी मिरवणुकीस प्रारंभ झाला. मारुती मंदिरात संजय कोळी या मानकऱ्यांच्या हस्ते पुजारी कल्याण स्वामी यांना अंघोळ घालून टाळ-मृदंगाच्या गजरात गण मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी सहा वाजता मिरवणूक मंदिराजवळ आल्यानंतर कल्लोळात पुजारी स्वामी यांना स्नान घालून भाकणूक कार्यक्रमासाठी आणण्यात आले. यावेळी मंदिरालगत ओठ्यावर मानकरी केशव डोके यांनी खरीप रब्बी हंगामातील धान्याचे ढिगारे मांडले होते. कल्याण स्वामी यांनी धान्यास स्पर्श करून गहू, ज्वारी, साली, मिरची, हरभरा या धान्य पिकांचे उत्पादन वाढेल व पर्जन्यमान भरपूर राहणार असल्याचे भाकित केले. पंचारतीने यात्रेची सांगता झाली. मिरवणुकीत भजनी मंडळ, तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांबरोबरच तुळजापूर व सोलापूर जिल्ह्यातून हजारो भाविक दर्शनासाठी आले होते. सावरगाव येथील क्लासमेट ग्रुपच्या वतीने भाविकांना लाडू व थंड पाण्याचे वाटप केले. यात्रास्थळी तामलवाडी पोलीस ठाण्याचे सपोनि मिर्झा बेग यांनी ३५ पोलीस कर्मचारी, दोन अधिकारी बंदोबस्तासाठी तैनात केले होते. तुळजापूर आगाराच्या वतीने जादा बसेसचीही सोय करण्यात आली होती. बसस्थानक ते नागोबा मंदिरपर्यंतचा परिसर भाविकांचे गर्दीने फुलून गेला होता. यात्रा काळात सावरगाव आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ.डी.एल. तेलंग यांनी आरोग्य पथक तैनात ठेवले होते. (वार्ताहर)