'फडणवीस साहेब, भुजबळांना पाठबळ देऊ नका'; मनोज जरांगे पाटील यांचे आवाहन
By राम शिनगारे | Updated: December 13, 2023 18:53 IST2023-12-13T18:52:33+5:302023-12-13T18:53:34+5:30
बीडच्या दंगली भुजबळांनीच घडविल्याचा आरोप

'फडणवीस साहेब, भुजबळांना पाठबळ देऊ नका'; मनोज जरांगे पाटील यांचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर : मराठा समाज न्याय्य हक्कासाठी लढा देत आहे. त्यात राज्यातील महत्त्वाचे मंत्री छगन भुजबळ खोडा घालत असून, त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पाठबळ मिळत आहे. त्यांच्या दबावामुळेच ६ कोटी मराठा समाजावर अन्याय सुरू आहे. त्यामुळे फडणवीस साहेब भुजबळांना पाठबळ देऊ नका, अन्यथा आपल्याला पश्चात्ताप करण्याची वेळ येईल, असे आवाहन मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी हॉस्पिटलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केले.
विधिमंडळाच्या अधिवेशनात मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण, ओबीसी, बीड जिल्ह्यातील जाळपोळीच्या घटनांवर भाष्य केले. त्यास मनोज जरांगे पाटील यांनी हॉस्पिटलमध्ये पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले. महाराष्ट्र अशांत करण्याचा भुजबळांचा डाव आहे. जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम ते करीत आहेत. त्या बदल्यात भुजबळांच्या भ्रष्टाचाराच्या केसेस मागे घेण्यास भाग पाडत आहेत. बीडमधील त्यांच्या पाहुण्याचे हॉटेल जाळले. यामागेही भुजबळ यांचाच हात असल्याचा अंदाज आता येऊ लागला आहे. त्यांना सर्वच प्रकारची इत्यंभूत माहिती असल्यामुळे त्यांनी बीड जिल्ह्यात दंगली घडविल्या असाव्यात, असेही त्यांनी सांगितले. शासनाला २४ डिसेंबरपर्यंत मुदत दिलेली आहे. या मुदतीत सरसकट कुणबी प्रमाणपत्र, अंतरवाली सराटीत दाखल गुन्हे मागे घेणे आणि अटक केलेल्या मराठा समाजातील युवकांना सोडून देण्याच्या मागण्या मान्य कराव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
...तर भाजपचा कार्यक्रम होईल
उपमुख्यमंत्री फडणवीस हे भुजबळांना बळ देत असल्याचा संशय आहे. त्यांनी असे करून मराठा समाजावर अन्याय करू नये, अशी विनंती आहे. मात्र, हे थांबले नाहीत तर भाजपचा नक्कीच ‘करेक्ट’ कार्यक्रम होईल, असा इशाराही त्यांनी दिली. पहिल्यासारखा आता मराठा राहिलेला नाही. मराठा समाज एकवटला आहे. त्यात आता कोणीही फूट पाडू शकत नसल्याचेही त्यांनी सांगितले.
१७ डिसेंबर रोजी आंदोलनाची दिशा ठरणार
मराठा आरक्षणासाठीच्या आगामी लढ्याची दिशा १७ डिसेंबर रोजी अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या बैठकीत ठरणार आहे. ही बैठक सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालणार आहे. त्यात समाजाच्या सर्व क्षेत्रांतील मान्यवर सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.