नियतीने जणू दिला दुसरा श्वास; काश्मीरमधून अनेक छ. संभाजीनगरकरांचा परतीचा प्रवास सुखरूप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 18:07 IST2025-04-25T18:06:47+5:302025-04-25T18:07:29+5:30

मरणाच्या छायेतून जीव वाचला, अशा शब्दात काश्मीरमध्ये अडकलेल्या आणि सुखरूप परतीचा प्रवास करणाऱ्या शहरवासीयांनी आपली भावना व्यक्त केली.

Destiny gave a second breath; Many Chh. Sambhajinagarkars return from Kashmir safely | नियतीने जणू दिला दुसरा श्वास; काश्मीरमधून अनेक छ. संभाजीनगरकरांचा परतीचा प्रवास सुखरूप

नियतीने जणू दिला दुसरा श्वास; काश्मीरमधून अनेक छ. संभाजीनगरकरांचा परतीचा प्रवास सुखरूप

छत्रपती संभाजीनगर : हसतमुख चेहऱ्यांनी काश्मीरची स्वप्नवत सफर सुरू केली. हिमाच्छादित पर्वतरांगांमध्ये मनमुराद क्षण टिपत असतानाच, एका क्षणात काळजाचा ठोका चुकविणारी दहशतवादी हल्ल्याची बातमी आली. क्षणातच आनंदाने भरलेली स्वप्नांची यात्रा, भीतीच्या सावटाखाली आली. सुदैवाने आम्ही हल्ल्याच्या ठिकाणी नव्हतो. ही केवळ सुदैवाची बाब नव्हे, तर नियतीने दिलेला जणू दुसरा श्वास आहे. मरणाच्या छायेतून जीव वाचला, अशा शब्दात काश्मीरमध्ये अडकलेल्या आणि सुखरूप परतीचा प्रवास करणाऱ्या शहरवासीयांनी आपली भावना व्यक्त केली.

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. पर्यटनासाठी शहरातून मोठ्या संख्येने शहरवासीय काश्मीरला गेले. या हल्ल्याच्या घटनेत छत्रपती संभाजीनगरचे अनेक नागरिकही थोडक्यात बचावले. ठिकठिकाणी नागरिक अडकून पडले. यातील अनेकांनी गुरुवारी परतीचा प्रवास केला.

डाॅक्टरांसह अनेक नागरिक
कॅन्सरतज्ज्ञ डाॅ. वरुण नागोरी, पूजा नागोरी, प्रिशा नागोरी, विहा नागोरी, अभिषेक मालपाणी, श्रद्धा मालपाणी, लक्ष मालपाणी, ध्रुव मालपाणी, दिपेश जाजू, स्नेहा जाजू, तरंग जाजू, ध्रूव जाजू, डाॅ. अभिषेक राठी, डाॅ. वर्षा राठी, इनाया राठी, ऋदय राठी, अभिषेक मोदानी, पायल मोदानी, अंश मोदानी, अनीश मोदानी, दिनेश ताठे, मनीषा ताठे, जिज्ञासा ताठे, मनोहर भोले, अदिती भोले, अक्षदा भोले यांनी गुरुवारी श्रीनगर विमानतळावरून परतीचा प्रवास केला.

सुदैवाने सुखरुप
१९ तारखेला आम्ही काश्मीरला गेलो. अशात दहशतवादी हल्ल्याची घटना घडली आणि आम्ही अडकलो. सुदैवाने आम्ही सुखरूप आहोत. या सगळ्या धावपळीत खूप थकलो. परतीच्या वाटेवर आहोत.
- डाॅ. वरुण नागोरी

आम्ही जाण्यापूर्वीच हल्ला
शहरातून आम्ही शनिवारी काश्मीरला आलो. जेथे हल्ला झाला, त्या पहलगामला आम्ही जाणार होतो. पण, त्याआधीच हल्ला झाला. आम्ही हाॅटेलमध्ये थांबलो. तेथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: आम्हाला घेण्यासाठी आले होते. त्यांनी व्यवस्था केली आणि त्यानंतर आमचा परतीचा प्रवास सुरू झाला.
- डाॅ. अभिषेक राठी

सरकारचे आभार
आम्ही सुरक्षित राहिलो. परतीच्या प्रवासासाठी श्रीनगर विमानतळावर वाट पाहात थांबलो आणि अखेर गुरुवारी सायंकाळी विमानाने मुंबईसाठी निघालो. महाराष्ट्र सरकार, सर्व अधिकारी आणि प्रतिनिधींचे आभार.
- दिनेश ताठे

हल्ला झालेल्या परिसरातून शहरात
मोहन पारगावकर, मंजुषा पारगावकर हे शहरात सुखरूप परतल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली. दहशतवादी हल्ला झाला तेव्हा पारगावकर दाम्पत्य हे अलीकडच्या परिसरात होते.

काही जण अजून अडकलेले
काही जण अजूनही काश्मीरमध्ये अडकून पडले आहेत. त्यात शहरवासीयांचाही समावेश असण्याची शक्यता आहे. काही शहरवासीय हल्ला झालेले ठिकाण वगळता इतर भागातील पर्यटनाच्या ठिकाणी जात असल्याचे टूर व्यावसायिकांनी सांगितले.

Web Title: Destiny gave a second breath; Many Chh. Sambhajinagarkars return from Kashmir safely

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.