केवळ दोन सदस्य असूनही सभापतीपद राष्ट्रवादीकडे
By Admin | Updated: July 22, 2014 00:18 IST2014-07-21T23:35:08+5:302014-07-22T00:18:06+5:30
बिलोली : बिलोली पंचायत समितीमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसून सभागृहात केवळ दोनच सदस्य असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आगामी सभापतीपद जाणार आहे़

केवळ दोन सदस्य असूनही सभापतीपद राष्ट्रवादीकडे
बिलोली : बिलोली पंचायत समितीमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसून सभागृहात केवळ दोनच सदस्य असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आगामी सभापतीपद जाणार आहे़ दरम्यान, अनु़जाती प्रवर्गासाठी राखीव झालेल्या सभापतीपदी विद्यमान उपसभापती व्यंकट पाण्डवे थडीसावळीकर यांचीच वर्णी लागून बढती मिळणार असे दिसते़
बिलोली पंचायत समितीमध्ये आठ सदस्य असून एकाही पक्षाकडे स्पष्ट बहुमत नसले तरी निवडणूकपूर्व भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या छुपी युती आहे़ सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान रामतीर्थ जि़प़ आणि त्याच गटातील दोन पं़स़ गणासाठी भाजपाने उमेदवारच दिले नाहीत़
उर्वरित सहा जागेपैकी चार जागांवर भाजपने विजय खेचला़ भाजपचे जि़प़ सदस्य लक्ष्मण ठक्करवाड व राक़ाँ़चे जि़प़ सदस्य मोहन पाटील टाकळीकर यांनी निवडणुकीपूर्वीच राजकीय खेळी करून काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवले़ बिलोली पं़स़मध्ये मागच्या १३ वर्षांपासून युतीची सत्ता आहे़ बिलोलीच्या ग्रामीण भागात भाजपाचेच वर्चस्व आहे़ पं़स़च्या निवडणुकीनंतर भाजपा ४, राकाँ २ व काँगे्रसचे २ सदस्य आले़ भाजपा व राकाँची युती होवून भाजपचे सुभाष पाटील चिंचाळकर सभापती झाले़ आता उर्वरित अडीच वर्षाकरिता सभापती पद अनु़जाती (एस़सी़) प्रवर्गासाठी राखीव आहे़ परिणामी आठ सदस्यांत रामतीर्थ गटातील दोन्ही गणांतील उमेदवार पदासाठी दावेदार आहेत़ सरस्वतीबाई दासरवार व उपसभापती व्यंकट पाण्डवे यांच्यापैकी एक जण सभापतीपदी नक्कीच बसेल यात शंका नाही़
निवडणुकीपूर्वी व नंतर भाजपा व राकाँ यांच्यातील समझोतातून सभापती व उपसभापती पदासाठी वाटाघाटी झाल्या़ पहिल्यांदाच भाजपाचा सभापती व राकाँचा उपसभापती झाले़
आता उर्वरित अडीच वर्षाकरिता सभापती पद आपोआपच राष्ट्रवादीकडे जाणार, अन्य पक्षाकडे या पदासाठी उमेदवारच नाही तर चार सदस्यीय भाजपाकडे उपसभापतीपद जाईल़ उपसभापती व्यंकट पाण्डवे हे टाकळीकर यांचे कट्टर समर्थक आहेत व पूर्वाश्रमीक शिवसैनिक होते़ त्यामुळे भाजपाचा त्यांनाच हिरवा कंदील मिळेल असे दिसते़
(वार्ताहर)