उपमुख्यमंत्रीपद असंवैधानिक, आम्ही त्यांना मानणार नाही: उद्धव ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांवर वार
By बापू सोळुंके | Updated: October 11, 2025 20:05 IST2025-10-11T20:04:13+5:302025-10-11T20:05:20+5:30
राज्यसरकार विधानसभेचे विरोधीपक्षनेतेपद भरण्यास घाबरत आहे. केवळ संख्याबळ नसल्याच्या नियम दाखवत ते विधानसभेत विरोधीपक्षनेता नेमत नाहीत.

उपमुख्यमंत्रीपद असंवैधानिक, आम्ही त्यांना मानणार नाही: उद्धव ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांवर वार
छत्रपती संभाजीनगर : संख्याबळ नसल्याचे कारण देत विरोधीपक्षनेतेपद नेमत नाही. दुसरीकडे, मात्र नियमात नसताना दोन उपमुख्यमंत्री नेमले. हे दोन्ही उपमुख्यमंत्री कायदेशीर नसल्याने आम्ही त्यांना असंवैधानिक उपमुख्यमंत्र्यांना मानणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या विरोधीपक्षनेते पदाविषयीच्या दुटप्पी भूमिकेवर टिकास्त्र सोडले. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, या मागणीसाठी उद्धवसेनेच्यावतीने शनिवारी शहरात हंबरडा मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चानंतर ठाकरे यांनी औरंगपुरा येथील शिवसेनाभवनचे उदघाटन केले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, केंद्रात आणि राज्यात बहुमत आहे. आज विधानसभा आणि विधान परिषदेतील विरोधीपक्षनेतेपदे रिक्त आहेत. असे असताना राज्यसरकार विधानसभेचे विरोधीपक्षनेतेपद भरण्यास घाबरत आहे. केवळ संख्याबळ नसल्याच्या नियम दाखवत ते विधानसभेत विरोधीपक्षनेता नेमत नाहीत. एवढे नियम दाखवता, तर राज्यात दोन उपमुख्यमंत्री हे कोणत्या नियमाने नेमले? उपमुख्यमंत्रीपद संवैधानिक नाही, असे असताना दोन उपमुख्यमंत्री नेमले, असे नमूद करीत राज्यसरकारच्या दुटप्पी भूमिकेवर बोट ठेवले. यापुढे आम्ही त्यांना संवैधानिक उपमुख्यमंत्री मानणार नाही. असंवैधानिक उपमुख्यमंत्री म्हणणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
गद्दाराला उत्तर देत नाही
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल येथे तुमच्या हंबरडा मोर्चाची खिल्ली उडवत आणखी कितीवेळा हंबरडा फोडणार असा सवाल तुम्हाला केला, याकडे लक्ष वेधले असता ठाकरे म्हणाले की, मी गद्दाराला उत्तर देत नाही, त्यांची बोलायची कुवत नाही, त्याने बोलू पण नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज उद्धव ठाकरे दोघेही एकत्र येतील का, असे विचारले असता त्यांनी महाराष्ट्राच्या प्रश्नावर, संकटाच्या वेळी दोन्ही भाऊ एकत्र येऊ, असे उत्तर दिले. सहकारमंत्र्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी मागायचा नादच लागलाय, असे विधान केले, याविषयी विचारले असता सत्ताधाऱ्यांचे अनेक नाद आता बाहेर येऊ लागले आहे, कुणाचा डान्स बारचा नाद बाहेर आला, असे सांगून त्यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनाही लक्ष्य केले.