कृषी विभागाचा रोगापेक्षा इलाज भयंकर
By Admin | Updated: August 4, 2014 00:47 IST2014-08-03T23:57:48+5:302014-08-04T00:47:44+5:30
सेलू : मे महिन्यात ठिबकवर लावलेल्या कापसांच्या झाडाची पाने लाल पडू लागली व कापसाची वाढ खुंटल्यामुळे शेतकरी चिंतेत होते़

कृषी विभागाचा रोगापेक्षा इलाज भयंकर
सेलू : मे महिन्यात ठिबकवर लावलेल्या कापसांच्या झाडाची पाने लाल पडू लागली व कापसाची वाढ खुंटल्यामुळे शेतकरी चिंतेत होते़ त्यानंतर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने या कापसांच्या झाडावर फवारणीसाठी दिलेल्या औषधीमुळे कापसाचे अधिक नुकसान झाल्याची तक्रार आहेरबोरगाव येथील शेतकऱ्यांनी केली आहे़
सेलू परिसरात पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी ठिंबक सिंचनवर मे महिन्यात कापसाची लागवड केली़ परंतु, जून महिन्याच्या शेवटी या कापसाची पाने लाल पडली व वाढही खुंटली़ त्यामुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे धाव घेतली़ त्यानंतर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ठिबकवरच्या कापसाची पाहणी केली व कृषी विभागाकडून सवलतीच्या दरात फवारणीसाठी कीटकनाशके दिली़ परंतु, आहेरबोरगाव येथील पांडुरंग लहाने व जिवाजी मोगरे यांनी कापसाच्या झाडावर फवारणी केली असता कापसाचे अधिक नुकसान झाल्याची तक्रार दिली आहे़ कृषी विभागाकडून डायमेथोएट हे औषध व अॅग्रोस्टीन ही बुरशीनाशकाचा एक पुडा संबंधित शेतकऱ्यांना कापूस लाल पडू नये यासाठी दिला़ त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी तातडीने फ वारणी केली़ परंतु, पांडुरंग लहाने व जिवाजी मोगरे यांच्या शेतातील कापसाचे फवारणीनंतर अधिकच नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे़
दरम्यान, पांडुरंग लहाने यांनी दोन एकर कापसाच्या क्षेत्रावर कृषी विभागाने दिलेल्या औषधांची फवारणी केली. परंतु, कापसाची पाने अधिकच करपून व गळून जात असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत़ (प्रतिनिधी)
सेलू तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती
आॅगस्ट महिना उजडला असताना केवळ १२८ मि. मी़ पावसाची नोंद तालुक्यात झाली आहे़ त्यामुळे दुृष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे़ ठिबक सिंचनावर लावलेली कापसाच्या झाडांची पाने लाल पडू लागली व वाढ खुंटल्यामुळे पाणी असलेले शेतकरीही चिंतेत आहेत़ तसेच कोरडवाहू क्षेत्रावरील कापसाची परिस्थिती जेमतेम आहे़ अत्यल्प पावसामुळे कापसाची व सोयाबीनची पिके धोक्यात सापडली आहेत़ महागडी औषधी फवारणी करुन काहीच उपयोग होत नसल्याने शेतकरी वर्ग हैराण आहेत. मुळात पाऊसच कमी झाल्यामुळे पिकांची वाढ झालेली नाही़ त्याचबरोबर रोगांचेही प्रमाण वाढले आहे़ दरम्यान, निसर्गाच्या लहरीपणाचा व उपद्रवी वन्य प्राण्यांच्या चकरात शेतकरी अडकला आहे़