शिंदेफळमध्ये डेंग्यूसदृश रुग्ण

By Admin | Updated: May 8, 2014 00:27 IST2014-05-08T00:26:42+5:302014-05-08T00:27:41+5:30

घाटनांद्रा : शिंदेफळ, ता. सिल्लोड येथे काही खाजगी रुग्णालयात उपचार घेणार्‍या रुग्णांना डेंग्यूसदृश आजार झाल्याचे आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.

Dengue-like patients in Shindefal | शिंदेफळमध्ये डेंग्यूसदृश रुग्ण

शिंदेफळमध्ये डेंग्यूसदृश रुग्ण

 घाटनांद्रा : शिंदेफळ, ता. सिल्लोड येथे काही खाजगी रुग्णालयात उपचार घेणार्‍या रुग्णांना डेंग्यूसदृश आजार झाल्याचे आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. ६ दिवसांपूर्वी शिंदेफळ येथील ४ ते ५ रुग्णांना ताप व डेंग्यूसदृश आजार असल्याने त्यांना औरंगाबादच्या एम.जी.एम. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दिवसेंदिवस त्यांचा आजार वाढत असल्याने गावात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. याविषयी आमठाणा प्राथमिक आरोग्य केंद्रात माहिती मिळाल्यावर त्यांच्या पथकाने गावात येऊन खाजगी रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांच्या घरांची पाहणी केली असता त्यांच्या घरातील पिण्याच्या पाण्यात डास, अळ्या (जीव) आढळून आले असल्याचे पथकातील डॉक्टरांनी सांगितले. सविता गोरख अक्करकर, शालिक महादू साळवे (वय २०), गोरख सुनील अक्करकर व नारायण बाजीराव अक्करकर या चार रुग्णांवर औरंगाबादच्या एमजीएम रुग्णालयात उपचार चालू आहेत. ६ दिवसांपासून आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी श्रीनिवास सोनवणे, विद्या पवार, भालेराव, आरोग्यसेवक एम.एन. काथार व इतरांनी गावात सर्वेक्षण करून उन्हाळ्याच्या दिवसात होणार्‍या आजारांविषयी व डेंग्यू आजाराविषयी मार्गदर्शन व उपचार करून जनजागृती करीत असल्याचे वैद्यकीय अधिकारी सोनवणे यांनी सांगितले. उपचार घेत असलेल्या रुग्णांना डेंग्यू असल्याचे कोणत्याही तज्ज्ञ डॉक्टरांचे प्रमाणपत्र पाहावयास मिळाले नसल्याचे आरोग्य सेवक काथार यांनी सांगितले. गावातील काही आजारी रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेतले असून, त्यांच्यावर औषधोपचार चालू करण्यात आले आहेत. या गावात तालुका आरोग्य अधिकारी महेर व त्यांच्या इतर कर्मचार्‍यांनी गावात तपासणी करून पाहणी केली आहे. गावकर्‍यांनी सरळ खाजगी रुग्णालयात रुग्णांना दाखल केल्याने व माहिती मिळताच वैद्यकीय पथकाने दखल घेतल्याची माहिती सरपंच मीराबाई पांडुरंग सपकाळ यांनी दिली आहे. (वार्ताहर)

Web Title: Dengue-like patients in Shindefal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.