चणेफुटाणे विक्रेत्यास हप्त्याची मागणी; वाद चिघळून दोन गट लाठ्याकाठ्या, तलवारीसह भिडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 16:19 IST2020-12-26T16:15:03+5:302020-12-26T16:19:32+5:30
crime news in Aurangabad या हाणामारीत तलवारीने वार केल्याने एका गटाचे पाच तर दुसऱ्या गटाचे दोन जण जखमी झाले आहेत.

चणेफुटाणे विक्रेत्यास हप्त्याची मागणी; वाद चिघळून दोन गट लाठ्याकाठ्या, तलवारीसह भिडले
वाळूज महानगर ( औरंगाबाद ) : चणेफुटाणे विक्रेत्या टपरी चालकास हप्ता मागितल्याच्या कारणावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना शुक्रवार (दि.२५) रात्री ९.३० ते १२.३० वाजेच्या दरम्यान रांजणगावात घडली. या हाणामारीत तलवारीने वार केल्याने एका गटाचे पाच तर दुसऱ्या गटाचे दोन जण जखमी झाले आहेत. दरम्यान, दोन्ही गटांकडून एकमेकांना विरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अक्तर शेख (रा.रांजणगाव) याची दत्तनगर फाट्यावर चने-फुटाणे व शितपेय विक्रीची टपरी आहे. शुक्रवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास अक्तर हा टपरी बंद करुन मित्र तौसिफ शेख याच्या सोबत घरी चालला होता. यावेळी संतोष मासाळे (४० रा.साजापूर), सोनु मासोळे, संतोष याचा सासरा व एक नातेवाईक (नाव माहित नाही) इतर दोघांनी अक्तर यास अडविले. संतोष याने अख्तर यास तुला धंदा करायाचा असेल तर मला ५०० रुपये द्यावे लागतील असे म्हणून वाद घालण्यास सुरवात करीत अख्तर याची गच्ची धरली. या भांडणात मध्यस्थीसाठी गेलेला अख्तर याचा मित्र तौसिफ यास संतोष याने लाथ मारुन खाली पाडले. यानंतर संतोष व त्याच्या साथीदारानी अक्तर यास मारण्यासाठी धावले असता तो पळून गेल्याने त्यांनी तौसिफ शेख यास लाकडी दांड्याने मारहाण करुन त्याच्या दुचाकीची तोडफोड केली.
तर अर्जुन गुजर (२२ रा.रांजणगाव) याने दिलेल्या तक्रारीत संतोष मासोळे याचे रात्री अक्तर शेख व तौसिफ शेख या दोघासोबत भांडण झाले होते. या भांडणाच्या कारणावरुन अक्तर व तौसिफ यांनी मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास साथीदारांना सोबत घेऊन रांजणगावात अर्जुन गुजर याच्या घरी आले. अक्तर व त्याच्या साथीदाराने अर्जुन याच्या घराचा दरवाजा तोडून त्यास लाथा बुक्याने बेदम मारहाण केली. यानंतर अर्जुन याचा चुलत मामा सखाराम शिराळे याच्या घरात घुसुन त्यांना बेदम मारहाण करीत एकाने सखाराम शिरोळे यांच्या पोटावर व पाठीवर तलवारीने वार करुन आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले. या मारहाणीनंतर गंभीर जखमी सखाराम शिरोळे व अर्जुन गुर्जर या दोघांना नातेवाईकांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. या भांडणात अक्तर व त्याच्या साथीदारानी अर्जुन याचे नातेवाईक संजु शेषराव धोत्रे, बबड्या सखाराम मासोळे, अमृत पुंडलीक गायकवाड यांच्यावर तलवारीने वार केल्याने गंभीर जखमी आवस्थेत त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले.
तिघा गंभीर जखमीवर उपचार सुरु
या मारहाणीच्या घटनेत सखाराम शिरोळे याच्या छातीवर, डोक्यावर व पाठीवर तलवारीने वार करण्यात आले आहे. तर बबन मासोळे याच्या तोंडावर व संजय धोत्रे मांडीवर तलवारीने वार करण्यात आले आहे. या तिघावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. आज शनिवारी पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे, सहायक निरीक्षक गौतम वावळे व त्यांच्या सहकाºयांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली. या प्रकरणी परस्पर तक्रारीवरुन दोन्ही ११ जणाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही गटाच्या ८ संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
भांडणानंतर ९ दुचाकी फोडल्या
या भांडणात दोन्ही गटाच्या आरोपींनी घरासमोर उभ्या असलेल्या ८ दुचाकी तर दत्तनगर फाट्यावर १ दुचाकी अशा ९ फोडल्या आहेत. मध्यरात्री गावात सुरु असलेल्या या तुंबळ हाणामारीची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, उपनिरीक्षक प्रशांत गंभीरराव व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळ गाठुन पाहणी केली. पोलिस आल्याची चाहुल लागताच दोन्ही गटातील आरोपी घटनास्थळावर पसार झाले.