पाण्याच्या शोधातील हरणाचा विहिरीत पडून मृत्यू; पाणवठे आटल्याने परिस्थिती गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 17:45 IST2021-04-09T17:44:48+5:302021-04-09T17:45:45+5:30
परिसरातील पाणवठे आणि धरण क्षेत्रातील पाण्याची पातळी मृत साठ्यावर असल्याने वन्यप्राण्यांचे हाल होत आहेत.

पाण्याच्या शोधातील हरणाचा विहिरीत पडून मृत्यू; पाणवठे आटल्याने परिस्थिती गंभीर
सोयगाव : पाण्याच्या शोधात कळपातून भरकटलेल्या नर जातीच्या हरणाचा विहिरीत पडून बुडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना जरंडी शिवारात शुक्रवारी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळ गाठून हरणाचा मृतदेह बाहेर काढून अंत्यसंस्कार केले.
सोयगावसह परिसरात उन्हाची वाढलेली दाहकता वाढली आहे. परिसरातील पाणवठे आणि धरण क्षेत्रातील पाण्याची पातळी मृत साठ्यावर असल्याने वन्यप्राण्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे पाण्यासाठी वन्यप्राण्यांचा मोर्चा शेताकडे वळला आहे. कोरडेठाक झालेल्या पाणवठ्याने वन्यप्राणी पिण्याच्या पाण्यासाठी रखरखत्या उन्हात शिवाराकडे येत आहेत. यातच जंगलातील अन्न आणि पाण्याचा टंचाई निर्माण झाल्याने पिण्याच्या पाण्यासाठी आलेल्या कळपातून भरकटलेल्या नर जातीच्या हरिणाला पिण्याच्या पाण्यासाठी जीव गमवावा लागला आहे.
याबाबत वनविभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीतून मृत हरिणाला बाहेर काढून अंत्यसंस्कार केले. वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल गणेश सपकाळ, वनरक्षक माया जिने, वनमजूर गोविंदा गांगुर्डे, अमृत राठोड, छगन झाल्टे, ओम बिरारे आदींनी मृत हरिणाला विहिरीतून बाहेर काढून त्यावर शेतातच अंत्यसंस्कार केले.