भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 00:22 IST2019-02-27T00:21:57+5:302019-02-27T00:22:07+5:30
रस्ता ओलांडत असताना कामगार महिलेला भरधाव ट्रॅक्टरने चिरडल्याची घटना मंगळवारी बजाजनगरातील मोहटादेवी मंदिरासमोर घडली.

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने महिलेचा मृत्यू
वाळूज महानगर : रस्ता ओलांडत असताना कामगार महिलेला भरधाव ट्रॅक्टरने चिरडल्याची घटना मंगळवारी बजाजनगरातील मोहटादेवी मंदिरासमोर घडली. मीरा विद्यानंद इलग असे मृत महिलेचे नाव आहे. अपघातानंतर ट्रॅक्टरचालक फरार झाला असून, वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जालना जिल्ह्याच्या सेवली गावाजवळील पास्टा येथील मूळ रहिवासी असलेले विद्यानंद अर्जुन इलग (३३) हे पाच वर्षांपासून पत्नी मीरा (२८) व आदित्य (११) आणि अमृता (९) यांच्यासह बजाजनगरात वास्तव्यास आहे. दोघेही वाळूज औद्योगिक क्षेत्रातील खाजगी कंपनीत काम करतात. मीरा मंगळवारी सकाळी साडे सहा वाजेच्या दरम्यान कंपनीत कामाला जाण्यासाठी घरातून निघाल्या. येथील मोहटादेवी मंदिरासमोर कंपनीची बस थांबते. त्यामुळे मीरा रस्ता ओलांडून मंदिराच्या बाजूला जात होत्या.
त्याचवेळी जागृत हनुमान मंदिराकडून वडगावकडे जाणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरने (एमएच- २०, सीवाय-११७) त्यांना जोराची धडक दिली. यात त्या गंभीर जखमी झाल्या. रस्त्यावरील नागरिक व व्यवसायिकांनी त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पती विद्यानंद यांना घटनेची माहिती दिली. प्रकृती गंभीर असल्याने विद्यानंद यांनी नागरिकांच्या मदतीने पुढील उपचारासाठी मीरा यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. दरम्यान, हा ट्रॅक्टर मुरुमाची वाहतूक करित होता असे काही प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. भरधाव ट्रॅक्टरने मीरा इलग यांना धडक देतानाची घटना मंदिरासमोरील दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे.