विद्युत धक्क्याने दोन युवकांचा मृत्यू
By Admin | Updated: May 3, 2016 00:16 IST2016-05-03T00:09:47+5:302016-05-03T00:16:07+5:30
नळदुर्ग / परंडा : विद्युत खांबावर चढून काम करीत असताना विजेचा धक्का लागल्याने दोन युवकांचा मृत्यू झाला़ यातील एक घटना

विद्युत धक्क्याने दोन युवकांचा मृत्यू
खळबळ : सराटी, भोत्रा शिवारातील घटना
नळदुर्ग / परंडा : विद्युत खांबावर चढून काम करीत असताना विजेचा धक्का लागल्याने दोन युवकांचा मृत्यू झाला़ यातील एक घटना तुळजापूर तालुक्यातील सोमवारी सकाळी सराटी (ता़तुळजापूर) शिवारात तर दुसरी घटना भोत्रा (ता़परंडा) शिवारात घडली असून, संबंधित पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, तुळजापूर तालुक्यातील सराटी येथील नितीन लक्ष्मण कंटेकूरे हा युवक खासगी लाईनमन म्हणून काम करीत होता़ गावातीलच मल्लीकार्जुन पाटील यांच्या शेतातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता़ त्यामुळे सोमवारी सकाळी पाटील यांच्या शेतातील विद्युत खांबावर चढून तो जंपींग वायर जोडत असताना अचानक त्याला जोरात विद्युत धक्का बसला़ यात गंभीर जखमी झालेल्या नितीन कंटेकुरे याला अणदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ मात्र, डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले़ याबाबत सचिन कंटेकुरे यांनी दिलेल्या माहितीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ तपास पोहेकॉ संजीवन शिंदे हे करीत आहेत़
परंडा तालुक्यातील पिंपळवाडी येथील गणेश मुकुंद आलाट (वय-२४) हा युवक वीज सेवक म्हणून काम करत होता़ गणेश आलाट याने सोमवारी सकाळी भोत्रा शिवारातील विद्युत खांबावर काम करण्यासाठी परमीट घेवून कामासाठी गेला होता़ खांबावर चढून काम करीत असताना अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्याने त्याला जोराचा विद्युत धक्का बसला़ त्याला उपचारासाठी परंडा येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते़ मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले़ याबाबत विशाल कांबळे यांच्या माहितीवरून परंडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ (वार्ताहर)
आश्वासनानंतर पार्थिव घेतले ताब्यात
प्रेत ताब्यात घेण्यास नकार
भोत्रा शिवारात काम करण्यासाठी परमीट घेतलेले असतानाही वीज पुरवठा सुरू झाला आणि त्यातच विद्युत धक्का लागून गणेश आलाट या युवकाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला़ वीजपुरवठा सुरू करणाऱ्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी नातेवाईकांनी उपजिल्हा रूग्णालयात एकच गोंधळ घालण्यास सुरूवात केली़ निर्माण झालेली तणावाची परिस्थिती पाहता पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ़ प्रिती टिपरे यांनी या प्रकरणात योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी अंत्यसंस्कारासाठी पार्थिव ताब्यात घेतले़