मृत्यू चौक! ४ वर्षात २० जणांचे मृत्यू, आकाशवाणी चौकाचे संतप्त नागरिकांनी केले नामांतर
By सुमित डोळे | Updated: June 12, 2024 20:11 IST2024-06-12T20:10:51+5:302024-06-12T20:11:45+5:30
नागरिकांसाठी अत्यंत धोकादायक झालेला आकाशवाणी चौकात उपाययोजना करा

मृत्यू चौक! ४ वर्षात २० जणांचे मृत्यू, आकाशवाणी चौकाचे संतप्त नागरिकांनी केले नामांतर
छत्रपती संभाजीनगर : आकाशवाणी चौक व अमरप्रीत चौक दोन्ही बाजुच्या वाहतूकसाठी खुला करण्यासाठी गेल्या चार वर्षांपासून नागरिक सातत्याने आंदोलने करत आहेत. या चार वर्षात २० पेक्षा अधिक नागरिकांचा रस्ता ओलांडताना अपघाती मृत्यू झाला. मात्र, पोलिसांसह महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभागाला याचे अद्यापही गांभीर्य आलेले नाही. मंगळवारी महिलेच्या अपघाती मृत्यूनंतर मात्र संतप्त नागरिकांनी बुधवारी आकाशवाणी चौकाचे 'मृत्यू चौक' असे नामांतर करुन निषेध नोंदवला.
नागरिकांसाठी अत्यंत धोकादायक झालेला आकाशवाणी चौक ओलांडताना सुसाट गॅस टँकरच्या धडकेत अनिता यतीराज बाहेती (६५, रा. डोंबिवली) या ठार झाल्या. मंगळवारी सायंकाळी ७.४५ वाजता हा अपघात झाला. तर त्यांचे पती यतीराज हे गंभीर जखमी झाले. रस्ता ओलांडत असताना मोंढ्याकडून सेव्हनहिलकडे जाणाऱ्या सुसाट ट्रकने त्यांना धडक दिली.
पाच वर्षांपूर्वी आकाशवाणी व अमरप्रीत चौकात सरळ वाहतूक ठेवण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. चौक बॅरिकेड्सने बंद करण्यात आला. मात्र, आवश्यक उपाययोजना न राबवताच चौक बंद केल्याने अपघातांची मालिका सुरू झाली. पादचाऱ्यांना ओलांडण्यासाठी ठराविक वेळेला सिग्नल सुरू करण्यात आले. त्यामुळे वाहनचालकांचाही गोंधळ उडतो. बॅरिकेट असल्याने वाहनचालक थांबत नाहीत. परिणामी, नागरिक जीव मुठीत धरून रस्ता ओलांडतात. यातून अपघात होतात. वाहनांचा वेग अधिक असल्याने मृत्यूची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, प्रशासनाला गांभीर्य येणार कधी? असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्यांनी केला.