खड्डा वाचविताना निवृत्त अभियंत्याचा अपघातात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 23:18 IST2018-12-21T23:17:14+5:302018-12-21T23:18:50+5:30
कटकटगेट भागातील खड्डा वाचविताना कारच्या धडकेत सिंचन विभागातील निवृत्त कनिष्ठ अभियंत्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात दि.५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास झाला होता. पांडुरंग किसनशेठ वडनेरे (६७, रा. टीव्ही सेंटर, एन-१२, स्वामी विवेकानंदनगर, हडको) असे मृत अभियंत्याचे नाव आहे.

खड्डा वाचविताना निवृत्त अभियंत्याचा अपघातात मृत्यू
औरंगाबाद : कटकटगेट भागातील खड्डा वाचविताना कारच्या धडकेत सिंचन विभागातील निवृत्त कनिष्ठ अभियंत्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास झाला होता. पांडुरंग किसनशेठ वडनेरे (६७, रा. टीव्ही सेंटर, एन-१२, स्वामी विवेकानंदनगर, हडको) असे मृत अभियंत्याचे नाव आहे.
पांडुरंग वडनेरे हे दि.५ डिसेंबर रोजी सायंकाळी कटकटगेट येथून दुचाकीने (एमएच-२०-डीयू-२५) जात होते. यावेळी गेटपासून काही अंतरावर असलेला खड्डा वाचविताना त्यांच्यात आणि कार (एमएच-२०-ईजे-८६६२) मध्ये अपघात झाला. यात दुचाकीवरून खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघात झाल्यावर कारचालकाने त्यांना घाटीत दाखल केले. घाटीत प्रथमोपचार घेतल्यानंतर त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, उपचारादरम्यान शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी त्यांच्या मृतदेहाची घाटीत उत्तरीय तपासणी करण्यात आली. या अपघाताची नोंद जिन्सी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. वडनेरे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.