भरधाव दुचाकीच्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 18:20 IST2020-02-21T18:19:57+5:302020-02-21T18:20:19+5:30
खुलताबाद - फुलंब्री मार्गावरील ममनापूर गावातील घटना

भरधाव दुचाकीच्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धाचा मृत्यू
खुलताबाद : ममनापूर येथे शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान भरधाव दुचाकीने रस्ता ओलांडणाऱ्या वृध्दास जोरदार धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. माणिकराव आबा जाधव ( ६५ ) असे मृत वृद्धाचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, खुलताबाद-फुलंब्री मार्गावरील ममनापूर गावाजवळ माणिकराव जाधव हे दुपारी १२ वाजेच्या सुमारास रस्ता ओलांडत होते. याच दरम्यान फुलंब्रीरोडवरून आलेल्या एका भरधाव दुचाकीने ( क्र. एम.एच.21 ए.एल.4485 ) त्यांना जोरदार धडक दिली. जोरदार धडकेने जाधव गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ ग्रामस्थांनी उपचारासाठी खुलताबाद ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. मात्र येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, अपघात स्थळावरील जमावाने दुचाकी चालकास पोलीसाच्या स्वाधीन केले आहे. मृत जाधव याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, चार मुली असा परिवार आहे.