‘दया, कुछ तो गडबड है’, ‘विशाल’ची ४९ प्रकारची औषधी रुग्णांच्या पोटात

By संतोष हिरेमठ | Updated: December 14, 2024 17:17 IST2024-12-14T17:16:47+5:302024-12-14T17:17:07+5:30

‘ती’ बहुतांश औषधी संपल्याचा आता दावा : मोजकेच औषधी नमुने तपासणीला

'Daya, kuchha to gadbad hai', 49 types of medicine from 'Vishal Distributors' are in the stomachs of patients | ‘दया, कुछ तो गडबड है’, ‘विशाल’ची ४९ प्रकारची औषधी रुग्णांच्या पोटात

‘दया, कुछ तो गडबड है’, ‘विशाल’ची ४९ प्रकारची औषधी रुग्णांच्या पोटात

छत्रपती संभाजीनगर : अंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास बनावट औषधींचा पुरवठा करणाऱ्या कोल्हापूरच्या मे. विशाल एंटरप्रायजेसने घाटी आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात ५८ प्रकारची औषधी पुरवठा केल्याचे ४ दिवसांपूर्वी उघडकीस आले. मात्र, आता यातील ४९ प्रकारची औषधी संपल्याचे सांगण्यात येत आहे. बनावट औषधींचा प्रकार, त्यानंतर संबंधित एजन्सीने शहरात पुरवठा केल्याचे समोर येणे आणि तपासणीसाठी नमुने घेण्याच्या अवघ्या ४ दिवसांत औषधी संपल्याचेही सांगण्यात येत असल्याने ‘कुछ तो गडबड है दया’ अशी चर्चा आहे.

मे. विशाल एंटरप्रायजेसने छत्रपती संभाजीनगरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास (घाटी) तब्बल ३३ प्रकारची आणि जिल्हा रुग्णालयाला २५ प्रकारची औषधी पुरवठा केल्याचे उघडकीस आले. राज्यभरात बनावट औषधींचा प्रकार उघडकीस आल्यानंतर अन्न व औषधी प्रशासनाने (औषध) बुधवारपासून सरकारी रुग्णालयांतून तपासणीसाठी औषधी नमुने घेण्यास सुरुवात केली. घाटी रुग्णालयातून ५ आणि जिल्हा रुग्णालयातून ३ नमुन्यांची तपासणी झाली. जिल्हा रुग्णालयातील ३ पैकी २ औषधी नमुने हे मे. विशाल इंटरप्रायजेसने पुरवठा केलेली आहे. या ८ औषधी नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

घाटीत २६ प्रकारची औषधी संपली
मे. विशाल एंटरप्रायजेसने छत्रपती संभाजीनगरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास (घाटी) तब्बल ३३ प्रकारच्या औषधींचा पुरवठा केल्याचे १० डिसेंबर रोजी उघडकीस आले. या औषधींचा वापर तत्काळ थांबविण्यात आल्याचेही सांगण्यात आले. आता ४ दिवसांनंतर यातील २६ प्रकारची औषधी संपल्याचे घाटी प्रशासनाने सांगितले. उर्वरित ७ प्रकारची औषधीही केवळ महिनाभर पुरतील, इतकीच असल्याचे सांगण्यात आले.

जिल्हा रुग्णालयात २ प्रकारचीच उरली औषधी
जिल्हा सामान्य रुग्णालयात मे. विशाल एंटरप्रायजेसने मार्च २०२३ मध्ये २५ प्रकारची औषधी आणि १६ प्रकारचे सर्जिकल साहित्य पुरवले. या २५ पैकी २३ प्रकारची औषधी आता संपल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या केवळ मधुमेह आणि पोटदुखीच्या जवळपास ३५ हजार गोळ्या शिल्लक आहेत.

१२ लाख गोळ्या संपल्या
मे. विशाल एंटरप्रायजेसने पुरविलेली दोन प्रकारच्या १२ लाखांवर गोळ्या आता संपलेल्या आहेत, असे सांगण्यात येत आहे. अन्य प्रकारच्या औषधी गोळ्यांचीही संख्या अधिक आहे, जी आता संपलेली आहेत.

Web Title: 'Daya, kuchha to gadbad hai', 49 types of medicine from 'Vishal Distributors' are in the stomachs of patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.