रात्रंदिवस मशीनद्वारे उपसा

By Admin | Updated: July 9, 2014 00:07 IST2014-07-08T23:45:30+5:302014-07-09T00:07:31+5:30

वसमत : तालुक्यातील पूर्णा नदीच्या वाळू धक्क्यावर रेती घाटाचे ठेकेदारांकडून पूर्णा पात्रातून जेसीबी मशिनने रात्रंदिवस रेतीचा उपसा होत आहे.

Day by day machine | रात्रंदिवस मशीनद्वारे उपसा

रात्रंदिवस मशीनद्वारे उपसा

वसमत : तालुक्यातील पूर्णा नदीच्या वाळू धक्क्यावर रेती घाटाचे ठेकेदारांकडून पूर्णा पात्रातून जेसीबी मशिनने रात्रंदिवस रेतीचा उपसा होत आहे. सूर्यास्तानंतर व सूर्यादयापूर्वी रेती उत्खनन करू नये, असा नियम असताना नदीपात्रात रात्रभर जेसीबी मशीन सुरू असते. रेतीच्या वाहनांत पाच- पाच ब्रास वाळू भरून वाहने धावत असल्याने रस्त्याचीही दुर्गती होत असल्याचे चित्र आहे.
गौण खनिज अधिनियम १९५४ अन्वये सूर्याेदयापूर्वी व सूर्यास्तानंतर गौणखनिज उत्खनन, वाहतूक करणे गैरकायदेशीर ठरते; परंतु गौणखनिज व्यावसायिक व रेती माफियांना रात्रीचे उत्खननच फायदेशीर ठरत असल्याने रात्रीच नदीपात्रात मशीनद्वारे वाळू उपसा करून रात्रभर रेतीचे ट्रक पाठवायचे काम होत असते.
वसमत शहरातही पूर्णा, नांदेड, परभणी व हट्टा गावाकडून रात्रीच वाळूचे ट्रक दाखल होत असतात व गल्लोगल्लीत जावून रेती उतरण्याचे काम होत असते. अशा वाळू व्यावसायिकांस कायद्याची भीती नाही.
रेतीघाटाचा लिलाव करताना धक्क्यात किती वाळू साठा उपलब्ध आहे, याचे मोजमाप काढूनच लिलावाची किंमत ठरत असते. ठराविक कालावधीनंतर धक्क्यावाल्याने महसूल विभागास अहवाल सादर करावयाचा असतो; परंतु क्षमतेच्या कित्येकपट वाळूचा उपसा करून महसुलास चुना लावण्याचे काम धक्क्याचे ठेकेदाराकडून होत आहे. रॉयल्टीची पावती दोन ब्रासची असते. एका पावतीवर किमान पंधरा दिवस तरी वाळू माफिया रेतीवाहतुक करत असल्याचे चित्र आहे. यातून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवला जात असल्याचे दिसत आहे. महसूल विभागाकडून वारंवार तपासण्या झाल्या तरच रेती माफियांच्या ‘महसूल बुडाव’ अभियानाला लगाम लागू शकतो अन्यथा बेलगाम रेती उत्खनन होतच राहणार अशी स्थिती आहे.
ट्रकमध्ये पाच- पाच ब्रास रेती भरून वाहने धावत असल्याने अगोदरच निकृष्ट दर्जाचे झालेल्या रस्त्यांचे ओव्हरलोडमुळे पुरते तीनतेरा वाजत आहेत. वसमत येथील कौठा- कुरूंदा मुख्य रस्त्यावर तर अनेकदा रेतीचे ट्रक डांबरीकरण झालेल्या रस्त्यावर फसल्याचे विचित्र चित्र पहावयास मिळते.
वाळू वाहुतकीने सावंगी, सोन्ना, ढऊळगाव, करंजाळा, पिंपळगाव कुटे रस्ताही खराब झाल्याच्या तक्रारी आहेत व कारवाईचीही तमा नसते. नदीपात्रातून मशिनने रेतीचे उत्खनन करू नये, असेही नियम आहेत; परंतु सोन्ना, ब्राम्हणगाव, ढऊळगाव, माटेगाव धक्क्यावर जेसीबी मशिननेच उत्खनन होत आहे. याकडे आजवर कधी मंडळ अधिकारी, तलाठ्यांचे लक्ष गेलेले नाही.
दोन ब्रासपेक्षा जास्त वाळू एका वाहनात भरून देऊ नये, प्रत्येक वाहनास रॉयल्टीची पावती दोन ब्रासचीच असावी, हा नियमही वाळू माफिया पायदळी तुडवत असल्याचे चित्र आहे. किमान तीन ते पाच ब्रास वाळू सर्रास ट्रकमध्ये टिप्परमध्ये भरली जात आहे. आता तर पूर्णा, नांदेडकडून ६ ते ७ ब्रास वाळू घेऊन महाकाय टिप्पर दाखल होत आहेत.
वसमत तालुक्यातील वाळू माफिया या वाहनांतून येणाऱ्या वाळूची खरेदी करून साठा करून ठेवत आहेत. वसमत येथील आठवडी बाजार मैदानाजवळ, न. प. कार्यालयासमोर, न. प. च्या उद्यानाजवळ असे ओव्हरलोड रेतीचे ट्रक, टिप्पर उभे असल्याचे नेहमीचे चित्र आहे. मात्र याकडेही महसूल विभाग कधी लक्ष देत नाही, हे विशेष.
पिंपळगाव कुटे येथील रेती घाट लिलावात सुटला नसला तरी या घाटावरून वाळू उपसा अवैधरित्या सुरूच आहे.
पिंपळगाव कुटे भागातून अवैध उपसा केलेली रेती ठराविक वाळू व्यावसायिकांनी सिद्धेश्वर विद्यालयाजवळ, खंदारबन रस्ता, बहिर्जी महाविद्यालय व नगर पालिका परिसरात साठवणूक केल्याचेही चित्र आहे. हट्टा परिसरात तर रेतीचे प्रचंड साठे आहेत. मंडळ अधिकारी नांदेडहून अप-डाऊन करतात. ढऊळगाव, माटेगाव, परळीचे तलाठी वसमतहून तर सावंगी तुळजापूरवाडी सज्जाचे तलाठी परभणीहून अप-डाऊन करत असल्याने या भागातील अवैध वाळू साठ्यांवर कारवाई होण्याची भीती नाही. महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळेच वसमत तालुक्यात अवैध वाळू व्यावसायिक निर्ढावले आहेत.
एकीकडे रात्रंदिवस नदीपात्रातून वाळूचा अवैधरित्या उपसा सुरू असताना प्रशासनाकडून मात्र कुठल्याही प्रकारची कार्यवाही होताना दिसत नाही. (वार्ताहर)
ट्रकमध्ये पाच- पाच ब्रास रेती भरून वाहने धावत असल्याने अगोदरच निकृष्ट दर्जाचे झालेल्या रस्त्यांचे ओव्हरलोडमुळे पुरते तीनतेरा वाजत आहेत. याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे.
वसमत येथील कौठा- कुरूंदा मुख्य रस्त्यावर तर अनेकदा रेतीचे ट्रक डांबरीकरण झालेल्या रस्त्यावर फसल्याचे विचित्र चित्र पहावयास मिळते.
गौण खनिज अधिनियम १९५४ अन्वये सूर्याेदयापूर्वी व सूर्यास्तानंतर गौणखनिज उत्खनन, वाहतूक करणे गैरकायदेशीर ठरते.
वसमत शहरातही पूर्णा, नांदेड, परभणी व हट्टा गावाकडून रात्रीच वाळूचे ट्रक दाखल होत असतात व गल्लोगल्लीत जावून रेती उतरण्याचे काम होत असताना दिसत आहे.

Web Title: Day by day machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.