लाडक्या लेकीच्या लग्नात मनसोक्त नाचले, पाठवणी केली अन् काही तासांत पित्याने सोडले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 12:18 IST2025-04-25T12:12:22+5:302025-04-25T12:18:17+5:30
काही कळू न देता भावाने माहेरी आणले बहिणीला; समोर पित्याचे पार्थिव पाहून धाय मोकलून रडली नवविवाहित लेक

लाडक्या लेकीच्या लग्नात मनसोक्त नाचले, पाठवणी केली अन् काही तासांत पित्याने सोडले प्राण
छत्रपती संभाजीनगर : ज्या लेकीला लहानाचे मोठे केले. तिच्या विवाहामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. मागील दोन महिन्यांपासून बापाची धावपळ सुरू होती. लेकीच्या लग्नाचा दिवस आला. लग्नात बाप मनसोक्त नाचला; पण नियतीच्या मनात दुसरेच काही शिजत होते. मुलीची पाठवणी केल्यानंतर काही तासांनी त्याच दिवशी वडिलांचा मृत्यू झाला. बाप-लेकीची पाठवणीतली ती भेट शेवटचीच ठरली.
ही हृदयद्रावक घटना शहरातील मुकुंदवाडीतील संतोषीमातानगरात बुधवारी (दि. २३) दुपारी घडली. प्रकाशसिंह भिकूसिंह ताटू (६०), असे मृताचे नाव आहे. ताटू यांची मुलगी दीपाली हिचा मंगळवारी विवाह संपन्न झाला. ज्या दारात दीपाली बोहल्यावर चढली त्याच दारातून तिच्या लाडक्या पित्याची अंत्ययात्रा गुरुवारी (दि. २४) निघाली. दारात मांडव अजूनही तसाच होता.
पाहुणे, मित्र, आप्तेष्ट आदल्या दिवशीच लग्नघरी दाखल झाले होते. प्रकाशसिंह सतत कामात होते. मांडव टाकला गेला. मुलीला हळद लागली. मंगळवारी (दि. २२) सायंकाळी घरासमोरील मैदानावर लग्नही लागले. प्रकाशसिंह यांनी लाडक्या लेकीच्या डोक्यावर अक्षदाही टाकल्या. जवळचे लोक सांगत होते, दीपाली त्यांची लाडकी होती. त्यामुळे मुलीच्या हळदीत आणि लग्नात ते खूप नाचले.
आनंदाचे वातावरण दुःखात बदलले
बुधवारी पहाटे ४ वाजता मुलीची पाठवणी झाली. त्यानंतर प्रकाशसिंग ताटू गच्चीवर जाऊन झोपले. त्यानंतर मात्र ते उठलेच नाही. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला अन् आनंदाचे वातावरण दुःखात बदलले. लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांवर अंत्यसंस्कारात सहभागी होण्याची वेळ आली. प्रकाशसिंह ताटू यांना ५ मुली आणि १ मुलगा आहे. दीपाली त्यांची चौथ्या क्रमांकाची मुलगी होती.
वडील पुन्हा कधीही दिसणार नाही
लग्न लागल्यानंतर दीपाली सासरी गेली. भाऊ हा तिला परत आणण्यासाठी गेला होता. त्याचवेळी त्याला ही बातमी समजली. बहिणीला काहीही न कळू देता तो तिला माहेरी घेऊन आला; पण परत आल्यानंतर वडिलांचा घरात ठेवलेला मृतदेह पाहून तिने दारातच हंबरडा फोडला.