धरण तुडुंब, क्षमतेच्या अभावामुळे पाच दिवसांआड पाणीपुरवठा

By | Updated: November 29, 2020 04:05 IST2020-11-29T04:05:47+5:302020-11-29T04:05:47+5:30

औरंगाबाद : निसर्गाच्या कृपेने दोन वर्षांपासून जायकवाडी धरण तुडुंब भरत आहे. औरंगाबाद महापालिकेकडे जायकवाडीहून शहरात पाणी आणण्याची क्षमता नाही. ...

Dam Tudumba, water supply for five days due to lack of capacity | धरण तुडुंब, क्षमतेच्या अभावामुळे पाच दिवसांआड पाणीपुरवठा

धरण तुडुंब, क्षमतेच्या अभावामुळे पाच दिवसांआड पाणीपुरवठा

औरंगाबाद : निसर्गाच्या कृपेने दोन वर्षांपासून जायकवाडी धरण तुडुंब भरत आहे. औरंगाबाद महापालिकेकडे जायकवाडीहून शहरात पाणी आणण्याची क्षमता नाही. त्यामुळे शहरातील ६० टक्के नागरिकांची तहान भागविण्यात प्रशासनाला यश येत आहे. शहरातील ४० टक्के नागरिक पंधरा वर्षांपासून निव्वळ समांतर जलवाहिनीची वाट बघत आहेत. शहराची तहान मोठी आणि पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे पाच दिवसांआड नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. उन्हाळ्यात परिस्थिती आणीबाणीची होते.

१९७० पर्यंत शहराला हर्सूल तलावाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. शहर झपाट्याने वाढू लागल्याने तातडीने जायकवाडी येथून पाणी आणण्यात आले. हे पाणी कमी पडू लागल्यामुळे आणखी एक मोठी जलवाहिनी टाकून पाणी आणण्यास सुरुवात करण्यात आली. आता या दोन्ही जलवाहिन्यांचे आयुष्य जवळपास पंधरा वर्षांपूर्वी संपले आहे. शहराची आजची लोकसंख्या जवळपास अठरा लाखांपर्यंत पोहोचली आहे. शहराला दररोज किमान २०० एमएलडी पाण्याची गरज असताना महापालिका अवघ्या १२० एमएलडीवर बोळवण करीत आहे. शहरातील दोनशेपेक्षा अधिक वसाहतींमध्ये महापालिकेने जलवाहिन्या टाकलेल्या नाहीत. त्यामुळे या वसाहतींना मागील सात वर्षांपासून टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. वर्षभरापूर्वी राज्य शासनाने १६८० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेला मंजुरी दिली. योजना आजपर्यंत सुरू झालेली नाही. भविष्यात ती कधी सुरू होईल हेसुद्धा निश्चित नाही. काम सुरू झाल्यानंतर किमान तीन वर्षे शहरात पाणी आणण्यासाठी लागतील. तोपर्यंत शहराची अवस्था आणखी बकाल होणार, हे निश्चित.

६० कि. मी. अंतरापर्यंत नाममात्र गळती

जायकवाडीपासून शहरापर्यंतचे अंतर ६० कि.मी. आहे. त्यात चार ते पाच ठिकाणी पाण्याची गळती आहे. जलवाहिनी फुटून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाण्याचा प्रकार अजिबात होत नाही. महापालिकेकडून अधून-मधून जलवाहिन्यांची डागडुजी करण्यात येते.

समांतर जलवाहिनीची प्रतीक्षा

महाराष्ट्र शासनाने नवीन पाणीपुरवठा योजनेला मंजुरी दिली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. निविदा अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवण्यात आली आहे. शासनाकडून अंतिम मंजुरी मिळताच नवीन पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजनाचा मार्ग मोकळा होईल.

किरण धांडे, प्रभारी कार्यकारी अभियंता महापालिका.

उन्हाळ्यात परिस्थिती आणीबाणीची

दरवर्षी महापालिकेला पाणीपुरवठा करताना चार महिने प्रचंड त्रास सहन करावा लागतो. यंदा उन्हाळ्यात कोरोनामुळे एकही आंदोलन झाले नाही. एकाही वॉर्डात पाणीपुरवठ्याची ओरड झाली नाही. मागील अनेक वर्षांमध्ये महापालिकेसाठी हे वर्ष अत्यंत चांगले गेले असे म्हणता येईल.

शहराची लोकसंख्या

११ लाख ७५ हजार

०५ दिवसाआड पाणीपुरवठा

१०० लिटर प्रतिव्यक्ती

Web Title: Dam Tudumba, water supply for five days due to lack of capacity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.