गॅस गळतीमुळे सिलिंडरचा स्फोट; वेळीच दक्षता घेतल्याने संपूर्ण कुटुंब बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 19:39 IST2021-07-08T19:38:20+5:302021-07-08T19:39:31+5:30
Gas Cylinder explosion in Aurangabad संजयनगर येथील घटनेत संसारोपयोगी साहित्य खाक

गॅस गळतीमुळे सिलिंडरचा स्फोट; वेळीच दक्षता घेतल्याने संपूर्ण कुटुंब बचावले
औरंगाबाद : सकाळचा चहा करण्यासाठी गॅस पेटविताच सिलिंडरला लावलेल्या रेग्युलेटरने पेट घेतला. यामुळे घाबरलेले संपूर्ण कुटुंब घराबाहेर आले. यानंतर अवघ्या काही मिनिटांतच सिलिंडरचा स्फोट होऊन घराला आग लागली. अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी जाऊन आगीवर नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला. ही घटना गुरुवारी सकाळी ८:३० ते ९ वाजेच्या सुमारास संजयनगर येथे घडली.
जिन्सी परिसरातील संजयनगरमध्ये प्रणव संजय होनराव हे सहकुटुंब राहतात. गुरुवारी सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास त्यांच्या नातेवाईक महिलेने चहा करण्यासाठी स्वयंपाक खोलीतील गॅस शेगडी पेटवली. यावेळी अचानक सिलिंडरने पेट घेतला. यामुळे प्रणव यांचे सर्व नातलग तत्काळ घराबाहेर पडले. त्याचवेळी स्वयंपाकखोलीतून स्फोटाचा आवाज आला आणि आग लागली.
या घटनेची माहिती कळताच सिडको अग्निशामक दलाचे अधिकारी विजय राठोड, जवान रमेश सोनवणे, बाबासाहेब ताठे, रवींद्र हरणे, रामू बमणे, मोबिन उल्ला, वाहनचालक अब्दुल हमीद यांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले. तोपर्यंत घरातील फ्रीज, कुलर, इलेक्ट्रिक वायरिंग, पंखा, स्वयंपाक खोलीतील सर्व साहित्य जळून खाक झाले. ही आग सिलिंडरमधून गॅस गळतीमुळे लागल्याचे स्पष्ट झाले. सिलिंडरला भेग पडल्याचे दिसून आले. सुमारे दोन लाखाचे संसारोपयोगी साहित्य जळाले. या घटनेची माहिती मिळताच जिंसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बघ्याची गर्दी हटविली.