सायबर गुन्हेगारांनी सव्वादोन लाखांना लुटले; पोलिसांनी वर्षभर फिरवले, वाट्याला केवळ मनस्ताप
By सुमित डोळे | Updated: November 3, 2023 16:05 IST2023-11-03T16:00:40+5:302023-11-03T16:05:02+5:30
शहर पोलिसांच्या कार्यशैलीची अशीही अजब तऱ्हा : पैसे नाहीच पण वाट्याला केवळ मनस्ताप

सायबर गुन्हेगारांनी सव्वादोन लाखांना लुटले; पोलिसांनी वर्षभर फिरवले, वाट्याला केवळ मनस्ताप
छत्रपती संभाजीनगर : सायबर गुन्हेगारांचा कॉल असल्याचे कळताच कॉल कट करूनही मंजित भीमराव अंभोरे (३७, रा. एन-१३) यांच्या खात्यातून सायबर गुन्हेगारांनी २ लाख २५ हजार रुपये लंपास केले. यात तीन महिने उलटून अंभोरे यांना पैसे मिळाले नाहीच. परंतु पोलिसांनी त्यांना कार्यक्षेत्राचा वाद घालत वर्षभरात तब्बल तीन ठाण्यांत फिरवले. अखेर, तेराव्या महिन्यानंतर बेगमपुरा पोलिसांनी त्यांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे कष्ट घेतले.
सुरक्षारक्षक असलेले मंजित भारतमातानगरमध्ये कुटुंबासह राहतात. ४ ऑगस्ट २०१८ रोजी त्यांना दुपारी ३ वाजता अज्ञात क्रमांकावरून कॉल प्राप्त झाला. एसबीआय बँकेच्या हेल्पलाइन टीममधून बोलत असून, पैसे कमी झाल्यास आम्हाला कळवा, असे कॉलवरील व्यक्ती सांगत होता. मात्र, वेळीच संशय आल्याने मंजित यांनी कॉल कट केला. मात्र, तोपर्यंत त्यांच्या खात्यातून २ लाख २४ हजार ९९९ रुपये कमी झाल्याचा त्यांना मेसेज प्राप्त झाला होता. त्यांनी मयूर पार्कच्या बँकेच्या शाखेत धाव घेतली. त्यांनी खाते गोठवून कस्टमर केअरचा क्रमांक देऊन तक्रार करण्यास सांगितले. त्या हेल्पलाइनवरील कर्मचाऱ्याने तक्रार सोडवू, असे आश्वासन देत कॉल कट केला.
मंजित यांनी त्यानंतर पोलिस आयुक्तालयातील सायबर ठाण्यात तक्रार अर्ज दिला. सायबर पोलिसांच्या तपासात त्यांचे पैसे बिहारच्या रोहनकुमार बबन सिंग व बिरेंद्र कुमार यांच्या बँक खात्यात गेल्याचे निष्पन्न झाले. सायबर पोलिसांनी तपासाचे कागदपत्रे व तक्रार बेगमपुरा पोलिसांकडे वर्ग केली. बेगमपुरा पोलिसांनी मंजित यांचा जबाब नोंदवला. परंतु त्यानंतर हा प्रकार आमच्या हद्दीतला नसल्याचे सांगून हर्सूल पोलिसांकडे वर्ग केला. हर्सूल पोलिसांनी तक्रार स्वीकारली. त्यांनी पुन्हा मंजित यांचा जबाब नोंदवला व पुन्हा बेगमपुरा पेालिसांकडे वर्ग केला. असे करत प्रकरणाला वर्ष उलटले. १ नोव्हेंबर रोजी मंजित यांना बोलावून बेगमपुरा पाेलिसांनी अखेर यात गुन्हा दाखल केला.