सायबर गुन्हेगारीत औरंगाबाद शहर राज्यात तिसऱ्या क्रमांकावर
By Admin | Updated: April 28, 2016 00:16 IST2016-04-28T00:07:41+5:302016-04-28T00:16:21+5:30
औरंगाबाद : आशिया खंडात झपाट्याने वाढणारे शहर म्हणून औरंगाबादची ओळख आहे. परंतु याबरोबरच गुन्हेगारीही या शहरात मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

सायबर गुन्हेगारीत औरंगाबाद शहर राज्यात तिसऱ्या क्रमांकावर
औरंगाबाद : आशिया खंडात झपाट्याने वाढणारे शहर म्हणून औरंगाबादची ओळख आहे. परंतु याबरोबरच गुन्हेगारीही या शहरात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने जाहीर केलेल्या अहवालानुसार औरंगाबाद शहर हे सायबर क्राईममध्ये राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. २०१५ मध्ये शहरात १४८ सायबर गुन्हे घडल्याची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक प्रमाण हे कार्ड फ्रॉडचे असल्याची माहिती सायबर क्राईम विभागाने दिली.
तंत्रज्ञानामुळे दिवसेंदिवस सायबर गुन्हेगारीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पोलिसांकडून जनजागृती करून कोणतीही घट त्यामध्ये होण्यास तयार नाही. यासंदर्भात सीआयडीने जानेवारी महिन्यात एक अहवाल जाहीर केला. त्यामध्ये मुंबई शहर प्रथम क्रमांकावर तर औरंगाबाद तिसऱ्या क्रमांकावर आहे. बिहार, झारखंड, प. बंगाल, ओरिसा, दिल्ली येथील काही जिल्ह्यांतून यासंबंधीचे फोन येतात. बँक अधिकारी बोलत असल्याचे सांगतात. तुमचे क ार्ड ब्लॉक किंवा नवीन कार्ड द्यावयाचे आहे, असे बोलून सर्व माहिती विचारून घेतली जाते. ही माहिती घेतल्यानंतर काही वेळातच आॅनलाईन फसवणूक होते. तसेच एखादी महिला किंवा तरुणीच्या नावाने फेसबुकचे फेक अकाऊंट तयार करून, बदनामी केले जाते. क्रेडिट, डेबिट कार्ड फसवणुकीचे प्रमाणही खूप मोठे आहे.
इंडस्ट्रीला मोठा आर्थिक फटका
कॉर्पोरेट कंपन्यांचे अकाऊंट हॅक करून, ई-मेल फिशिंग अटॅक केला जातो. त्यामुळे इंडस्ट्रीला मोठा आर्थिक फटका बसतो. औरंगाबाद शहरात असे विविध सायबर गुन्हे वाढत आहेत.
ते असे-२०११ मध्ये २४, २०१२ -३१, २०१३-४७, २०१४ -६६ अशा सायबर गुन्ह्यांची नोंद पोलिसांकडे आहे.
तर २०१५ मध्ये यामध्ये मोठी वाढ होऊन १४८ गुन्हे घडले. त्यामध्ये ८८ हे कार्ड फ्रॉडचे गुन्हे आहेत.
वैयक्तिकमाहिती देऊ नये
कोणतीही बँक फोनवर किंवा ई-मेलवर कधीच माहिती मागवीत नाही. त्याकरिता नागरिकांनी आपल्या कार्डची माहिती फोनवर देणे टाळावे. तरुणांना आॅनलाईन नोकरीची आॅर्डर पाठविली जाते. त्याची खात्री केल्याशिवाय कोणताच आर्थिक व्यवहार करू नये. नागरिकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. -राहुल खटावकर,
सहायक पोलीस निरीक्षक, सायबर क्राईम