विद्यार्थ्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा तिघा जणांविरुद्धचा गुन्हा खंडपीठात रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 23:44 IST2018-06-07T23:41:23+5:302018-06-07T23:44:05+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थी गणेश कोपूरवाड याचा सतत छळ करून त्याला ‘आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत’ तीन जणांविरुद्ध दाखल झालेला गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्ना वराळे आणि न्या. विभा कंकणवाडी यांनी रद्द केला.

विद्यार्थ्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा तिघा जणांविरुद्धचा गुन्हा खंडपीठात रद्द
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थी गणेश कोपूरवाड याचा सतत छळ करून त्याला ‘आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत’ तीन जणांविरुद्ध दाखल झालेला गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्ना वराळे आणि न्या. विभा कंकणवाडी यांनी रद्द केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिकत असलेला संगणकशास्त्राचा विद्यार्थी गणेश कोपूरवाड याने वसतिगृहामधील रूममध्ये १५ सप्टेंबर २०१७ रोजी आत्महत्या केली होती. गणेशचा भाऊ उमेश कोपूरवाड याने यासंदर्भात बेगमपुरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यात त्याने म्हटल्यानुसार त्याचा भाऊ गणेश हा संगणकशास्त्राच्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता. उमेशसोबत तो वसतिगृहात राहत होता. रेणुका गवारकर, ज्योती तांगडे, अक्षय गायकवाड, आकाश गायकवाड इत्यादींच्या सततच्या छळामुळे गणेश हा मानसिक तणावाखाली
होता.
तो त्याच्या वर्गातसुद्धा जाण्यास घाबरत होता. त्यांनी केलेल्या सततच्या छळामुळे गणेशने आत्महत्या केली, असे उमेशने फिर्यादीत म्हटले
होते.
गणेशच्या आत्महत्येनंतर बेगमपुरा पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रद्द करावा, अशी विनंती करणारा फौजदारी अर्ज अक्षय गायकवाड, आकाश गायकवाड आणि ज्योती तांगडे यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केला होता.
सुनावणीअंती खंडपीठाने वरील तिन्ही जणांविरुद्धचा गुन्हा रद्द केला. वरील तिघांवरील आरोप हे संदिग्ध स्वरूपाचे आहेत. त्यामुळे अर्जदारांविरुद्ध खटला चालविणे योग्य होणार नाही, असे नमूद करीत खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला. या प्रकरणात अर्जदारांतर्फे अॅड. सुदर्शन साळुंके आणि अॅड. एन.डी. सोनवणे यांनी, तर सरकारतर्फे अॅड. आर.बी. बागूल यांनी काम
पाहिले.