संवेदनशून्यतेचा असाही कळस, जायकवाडी धरणावरील भूकंपमापक यंत्र चार वर्षांपासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2022 19:46 IST2022-01-12T19:43:45+5:302022-01-12T19:46:47+5:30
भूकंप वा इतर सदृश धक्का मोजण्यासाठी जायकवाडीवर बसविण्यात आलेले यंत्र २०१७ पासून बंद पडलेले आहे.

संवेदनशून्यतेचा असाही कळस, जायकवाडी धरणावरील भूकंपमापक यंत्र चार वर्षांपासून बंद
- विकास राऊत
औरंगाबाद : जायकवाडी धरणावरीलभूकंपमापक यंत्र २०१७ पासून बंद पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. १५ लाखांच्या आतील खर्चासाठी जलसंपदा विभागाने हात आखडता घेतला आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे मागील २३ महिन्यांत यंत्रदुरुस्तीची संचिका पुढे सरकणे म्हणजे संवेदनशून्यतेचा कळस म्हणावा लागेल.
२१ जुलै २०२० रोजी खुलताबाद तालुक्यात भूगर्भातून मोठा आवाज होत धक्के बसल्याचे जाणवले होते. त्यानंतर ११ जानेवारी २०२२ रोजी कन्नड तालुक्यातील काही भागांत भूगर्भातून आवाज आला. तालुक्यातील बहुतांश गावांत भूकंपसदृश धक्के बसले. त्या धक्क्यांची नोंद जायकवाडी धरणावरील भूकंपमापक यंत्रावर होईल, असे अभिप्रेत होते, परंतु तेथील अभियांत्रिकी विभागाशी संपर्क केला असता धक्कादायक माहिती समोर आली, भूकंप वा इतर सदृश धक्का मोजण्यासाठी जायकवाडीवर बसविण्यात आलेले यंत्र २०१७ पासून बंद पडलेले आहे. ते यंत्र पुरविणारी कंपनी बंद पडल्याने मेरी (महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट)कडे प्रस्ताव पाठवूनही पुढे काहीही झालेले नाही. जायकवाडी अभियांत्रिकी विभागाकडे यंत्रच नसल्याने कन्नड तालुक्यातील भूगर्भातील हालचालींची तेथे नोंदच झाली नाही.
प्रस्तावांवर प्रस्ताव
नाशिक येथील धरण सुरक्षा कार्यालयाकडे २७ डिसेंबर २०१९ रोजी भूकंपमापक यंत्र बसविण्यासाठी प्रस्ताव पाठविला होता. त्यानंतर त्यांनी एका अभियंत्यामार्फत स्थळपाहणी केली. पाहणीनंतर त्यांनी अमेरिकन कंपनीचे डिजिटल यंत्र बसविण्याची सूचना केली. त्यालादेखील संमती दर्शविण्यात आली. जायकवाडी धरणावरील यंत्र अपडेट असणे गरजेचे असल्यामुळे यावर्षीही पथकाने पाहणी केली. अमेरिकन तंत्रज्ञानाचे यंत्र घेण्यासाठी १३ ते १५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पण संबंधित खाते पाऊल उचलण्यास तयार नाही.
भूगर्भातील पाण्यामुळे ते धक्के
आशिया खंडात कुठेही भूकंप झाला तरी त्याची नोंद नांदेड आणि हैदराबाद येथे होते. नांदेड येथील यंत्रावर काही नोंद झाली नाही. हैदराबाद येथील एनजीआरआयकडे या धक्क्याबाबत नोंद नसल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय चौधरी यांनी सांगितले. कन्नड तालुक्यातील धक्के भूगर्भातील पाणीपातळीचे असतील, असा दावा चौधरी यांनी केला.
यंत्र सध्या काम करीत नाही
जायकवाडीतील यंत्र दुरुस्तीसाठी नेलेले आहे. ५ जानेवारी रोजी पथक आले होते. त्यांनी स्थळपाहणी केली. नवीन यंत्रे आणून ते तपासणी करतील, येथील यंत्रे सध्या काम करीत नाहीत.
-विजय काकडे, कार्यकारी अभियंता, जायकवाडी