क्रूर शासक औरंगजेब आपला नायक होऊच शकत नाही; केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 11:40 IST2025-04-19T11:39:52+5:302025-04-19T11:40:40+5:30
छत्रपती संभाजीनगरात शूरवीर महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्याचे अनावरण

क्रूर शासक औरंगजेब आपला नायक होऊच शकत नाही; केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह
छत्रपती संभाजीनगर : काही लोक औरंगजेबाचे महिमामंडन करून त्याला हिरो करण्याचा प्रयत्न करीत असले तरी आमच्या प्रेरणास्थानांवर हल्ला करणारा, प्रार्थनास्थळे उद्ध्वस्त करणारा क्रूर शासक आपला नायक कदापि होऊ शकत नाही. असे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी शुक्रवारी ठणकावून सांगितले.कॅनॉट गार्डन परिसरातील उद्यानात महापालिकेने उभारलेल्या शूरवीर महाराणा प्रतापसिंह यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी ते जाहीर सभेत बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अध्यक्षस्थानी होते.
राजनाथसिंह म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शूरवीर महाराणा प्रतापसिंह यांची स्मारके नवपिढीचे प्रेरणास्रोत आहेत. पहिले पंतप्रधान पं. नेहरू यांनीदेखील त्यांच्या पुस्तकात औरंगजेबाचा क्रूर शासक असा उल्लेख केलेला आहे. औरंगजेबाने मराठा, राजपूत, शिखांवर अत्याचार केले. हिंदूंची मंदिरे नष्ट केली. औरंगजेबाचे महिमामंडन करणारे लोक दारा शुकोव्हबाबत बोलत नाहीत. महाराणा प्रतापसिंहांसोबत असलेल्या अदिलखान सुरीबाबतही बोलत नाहीत. मुळात दारा शुकोव्ह हे योगी, संन्यासी, वेद व कुराणाचा सन्मान करायचे. त्यांची हत्या औरंगजेबाने केेली. अशा अत्याचाऱ्याचे नाव या शहराला होते, ते बदलून छत्रपती संभाजीनगर केले, तर काय फरक पडतो? औरंगजेब रोडचे नाव बदलून डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम केले तर काय फरक पडतो? महाराणा यांच्यासोबत आदिवासी, मुस्लिमदेखील होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षकही मुस्लिम होते. औरंगजेबाचे समर्थन करून पाकिस्तानला तेथील मुस्लिमांचे समर्थन मिळेल, मात्र येथे मिळणार नसल्याचे ते म्हणाले.
याप्रसंगी राज्यपाल हरिभाऊ बागडे, पालकमंत्री संजय शिरसाट, ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे, मेवाड नरेश लक्ष्यराजसिंह यांची भाषणे झाली. पणनमंत्री जयकुमार रावल, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खा. संदीपान भुमरे, खा. डॉ. भागवत कराड, आ. प्रदीप जैस्वाल, संजय केणेकर, अनुराधा चव्हाण, नारायण कुचे, शिरीष बोराळकर, कृपाशंकरसिंह, मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांची उपस्थिती होती.
पुतळा प्रेरणास्रोत : मुख्यमंत्री
छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजीराजे, गुरू तेगबहादूर, महाराणा प्रतापसिंह यांचा इतिहास प्रेरणादायी आहे. महाराणा प्रतापसिंह यांनी अकबराचे मांडलिकत्व स्वीकारले नाही. महाराणा प्रतापसिंह, छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे प्रेरणास्रोत आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.