खरेदीसाठी गर्दीच गर्दी चोहीकडे; रस्त्यावर वाहन पार्किंगमुळे ग्राहकांना चालणे झाले कठीण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 19:05 IST2025-10-13T19:04:26+5:302025-10-13T19:05:04+5:30
वाहतूक पोलिस कुठेच दिसून येत नव्हते, यामुळे ग्राहकांचे अर्धे लक्ष दुकानात खरेदीकडे आणि अर्धे लक्ष वाहनाकडे लागले होते.

खरेदीसाठी गर्दीच गर्दी चोहीकडे; रस्त्यावर वाहन पार्किंगमुळे ग्राहकांना चालणे झाले कठीण
छत्रपती संभाजीनगर : दिवाळी सणाच्या धामधूमीला आता वेग आला आहे. अनेकांनी खरेदीसाठी रविवारचा दिवस कुटुंबासाठी राखीव ठेवला होता. सकाळपासूनच बाजारपेठेत खरेदीचा उत्सव सुरू झाला आणि दुपारपर्यंत ‘गर्दीच गर्दी चोहीकडे’ असे म्हणण्याची वेळ आली. चोहोबाजूने जणू ग्राहकांची गर्दी उसळली होती. ऐन रस्त्यावर वाहन पार्किंग आणि कोणतेही नियम न पाळता दोन्ही बाजूने सुरू असलेली वाहतूक यामुळे एवढी गर्दी जमत होती की, पायी चालण्यात अनंत अडथळे येत होते.
विशेष म्हणजे, वाहतूक पोलिस कुठेच दिसून येत नव्हते, यामुळे ग्राहकांचे अर्धे लक्ष दुकानात खरेदीकडे आणि अर्धे लक्ष वाहनाकडे लागले होते. शनिवारनंतर रविवार हा ‘सुपर संडे’ ठरला. जुन्या शहरातच नव्हे, तर टीव्ही सेंटर, आविष्कार कॉलनी चौक परिसर, गजानन मंदिर चौक परिसर, जवाहर कॉलनी अशा विविध बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी शहरवासीयांची झुंबड उडाली होती.
सायंकाळनंतर या गर्दीत आणखी भर पडली. रेडिमेड कपडे, आकाशकंदील, रांगोळ्या, रेडिमेड फराळ, सजावटीचे साहित्य, इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात गर्दी बघण्यास मिळाली.
मात्र, वाहतूक जामचा त्रास ग्राहकांना सहन करावा लागला. विशेषत: पैठणगेट ते गुलमंडी, औरंगपुरा, कुंभारवाडा, रंगारगल्ली, मछलीखडक या रोडवर कोणीही मनमानीपणे दुचाकी, चारचाकी रस्त्यावर उभे करीत होते. दुसऱ्यांना अडचण होईल, वाहतुकीला अडथळा होईल याचे भानही कोणी ठेवत नव्हते. मुख्य बाजारपेठेत वाहतुकीला बंदी घालणे आवश्यक होते, पण वाहतूक पोलिसांकडून अशी कोणतीही खबरदारी घेतली जात नव्हती. जुन्या शहरात काही गल्ल्यांमध्ये तोरण विक्रेत्यांनी आकर्षकरीत्या तोरण लटकवून ठेवले होते. जणू काही त्या गल्लीतील रहिवाशांनीच स्वागत कमानी व तोरण उभारल्याचे जाणवत होते.