अकरा वीटभट्टी चालकांवर गुन्हे
By Admin | Updated: July 14, 2014 00:59 IST2014-07-13T23:43:19+5:302014-07-14T00:59:39+5:30
पालम : तालुक्यात गोदावरी नदीच्या काठावरील वीटभट्टी व्यवसाय करणाऱ्या चालकांनी शासनाचा महसूल बुडविला आहे.

अकरा वीटभट्टी चालकांवर गुन्हे
पालम : तालुक्यात गोदावरी नदीच्या काठावरील वीटभट्टी व्यवसाय करणाऱ्या चालकांनी शासनाचा महसूल बुडविला आहे. या वीटभट्टीचालकांकडून रक्कम वसूल करण्यासाठी तहसील कार्यालयाच्या पथकाने कारवाई सुरु केली आहे. महसूल बुडविणाऱ्या ११ वीटभट्टीचालकांवर पालम पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेमुळे वीटभट्टीचालकांत धावपळ सुरू झाली आहे.
तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणात वीटभट्टी व्यवसायासाठी माती उपलब्ध होत आहे. तसेच पाण्याची व्यवस्था असल्याने या परिसरात जागोजागी वीटभट्ट्यांचा व्यवसाय थाटला आहे. या व्यवसायात कोट्यवधींची उलाढाल होत असल्याने दरवर्षी वीटभट्टींचा आकडा वाढत आहे. शासनाचे नियम धाब्यावर बसवित भट्टीचालकांनी मनमानी कारभार सुरू केल्याने शासनाला लाखो रुपयांचा चूना लागत आहे. वीटभट्टी चालकांकडून कर भरले जात नाहीत. यामुळे तहसील कार्यालयाने महसूल वसूलीसाठी विशेष मोहीम राबवित पथक निर्माण केले आहे.
या पथकाने तहसीलदार अनंत देशपांडे यांच्या आदेशावरून गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू केली आहे. फरकंडा, डिग्रस, बरबडी या गावातील गोदावरीच्या काठावरील ११ वीटभट्टीचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून ३ लाख ७० हजार ५३ रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. पालम पोलिस ठाण्यात फिर्यादी तलाठी सतीश मुलगीर यांच्या फिर्यादीवरून ११ वीटभट्टीचालकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आल्याने वीटभट्टीचालकांची धावपळ सुरू झालेली आहे. तपास पालम पालिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिनेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार प्रभाकर राठोड, रंगनाथ दुधाटे हे करीत आहेत. (प्रतिनिधी)
लाखो रुपयांची होणार वसुली
पालम तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वीटभट्ट्या चालविल्या जातात. या वीटभट्टीकडून म्हणावा तसा महसूल शासनदरबारी जमा होत नाही. त्यामुळे लाखो रुपयांचा फटका शासनाला बसत आहे. वीटभट्टी चालकांच्या विरोधात तहसील कार्यालयाने मोहीम उघडल्याने लाखो रुपयांचा महसूल जमा होण्याची शक्यता आहे.