वाळूमाफियांकडून महसूल पथकावर हल्ल्याप्रकरणी १२० जणांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 00:24 IST2018-12-25T00:23:46+5:302018-12-25T00:24:02+5:30
सहा जणांना अटक : फरार आरोपींच्या शोधात पोलीस रवाना

वाळूमाफियांकडून महसूल पथकावर हल्ल्याप्रकरणी १२० जणांविरुद्ध गुन्हा
देवगाव रंगारी : वाळूमाफियांनी रविवारी शिवना नदीपात्रात महसूलच्या पथकावर हल्ला केल्याप्रकरणी देवगाव रंगारी पोलिसांनी सोमवारी १२० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. यापैकी सहा जणांना अटक करण्यात आली असून, उर्वरित आरोपींच्या शोधात पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.
वैजापूर येथील तहसीलचे पथक लाखणी-मांडकी येथे अवैध वाळू उपसा व वाहतूक रोखण्यासाठी रविवारी गेले असता शिवना नदीपात्रात वाळू तस्करांसह जमावाने दगडाने हल्ला केला होता. या हल्ल्यात नायब तहसीलदारांसह तीन महसूल कर्मचारी गंभीर जखमी झाले होते. सायंकाळी ६ वाजता पथक नदीपात्रात गेल्यावर एका टेम्पो व ट्रॅक्टरमध्ये १५ ते २० लोक वाळू भरताना दिसले. पथकाला पाहून हे लोक पळून गेले. टेम्पोचालक प्रभाकर मुळे व ट्रॅक्टर चालकाला पथकाने आपली वाहने वैजापूर तहसीलला नेण्यास सांगितल्यानंतर वाद झाला. चालकांनी पथकातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यांना समजावून सांगत असताना रामा मुळे, विठ्ठल उबाळे, शिवनाथ मुळे, गणेश वाहूळ, किशोर आवारे, सचिन निपाणे, नानासाहेब मुळे यांच्यासह देवळी येथील १२० महिला व पुरुष हातात लाठ्याकाठ्या व फावडे घेऊन धावून आले. पथकाला घेराव घालून मारहाण करण्यास सुरुवात केल्याने पथकातील नायब तहसीलदार भालेराव, संतोष जाधव, सचिन गायकवाड, विलास तोडगे, श्रीकांत म्हस्के हे गंभीर जखमी झाले.
तलाठी श्रीकांत म्हस्के यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी १२० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. यातील आरोपी गंगाधर कारभारी मुळे, शिवनाथ अंबादास मुळे, सचिन गुलाबराव निपाणे, नानासाहेब बाबुराव मुळे, विठ्ठल दिगंबर आवारे, गणेश प्रकाश वाहूळ यांना रात्री अटक करण्यात आली. त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास स.पो.नि. स्वप्ना शहापूरकर करीत आहेत.