क्रेडिट कार्ड, मोबाईल चोरणारे तिघेजण जेरबंद
By Admin | Updated: May 24, 2014 02:10 IST2014-05-24T01:53:47+5:302014-05-24T02:10:07+5:30
औरंगाबाद : विद्यार्थ्यांच्या खोलीतून मोबाईल, क्रेडिट व डेबिट कार्ड चोरून त्याद्वारे खरेदी करणार्या तीन भामट्यांना सायबर क्राईमच्या पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली.

क्रेडिट कार्ड, मोबाईल चोरणारे तिघेजण जेरबंद
औरंगाबाद : विद्यार्थ्यांच्या खोलीतून मोबाईल, क्रेडिट व डेबिट कार्ड चोरून त्याद्वारे खरेदी करणार्या तीन भामट्यांना सायबर क्राईमच्या पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. सय्यद मुजफ्फर सय्यद मकसूद (३५, रा. संजयनगर, बायजीपुरा), शफिक कुरेशी महेमूद कुरेशी (२३, रा. आसेफिया कॉलनी) व फारुक कुरेशी करीम कुरेशी (२४, रा. सिल्लेखाना) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या तिघांना सायबर क्राईमच्या पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिसी हिसका दाखवताच त्यांनी शहानूरमियाँ दर्गा परिसरात विद्यार्थ्यांचे मोबाईल, क्रेडिट व डेबिट कार्ड चोरल्याची कबुली दिली. दोन एप्रिल ज्ञानेश्वर देवरे व त्याचे मित्र हे शहानूरमियाँ दर्गाजवळील त्यांच्या खोलीत झोपले होते. पावणेआठ वाजेच्या सुमारास देवरेचा एक मित्र खाजगी क्लासेसला गेला. जाताना त्याने खोलीचा दरवाजा ओढून घेतला होता. सकाळी ८ वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर देवरे व त्याचे अन्य मित्र झोपेतून उठले तेव्हा त्यांचा चार्जिंगला लावलेला सॅमसंग ग्रँड-२ हा १८ हजार रुपये किमतीचा मोबाईल गायब असल्याचा दिसला. देवरेच्या खिशातील क्रेडिट व डेबिट कार्डही चोरीला गेल्याचे त्याच्या निदर्शनास आले. सायबर क्राईम सेलचे निरीक्षक गौतम पातारे, कर्मचारी सय्यद रफिक, धुडकू खरे, महेश कोमटवार, रेवणनाथ गवळी, गणेश वैराळकर, रवींद्र खरात, नितीन देशमुख, जयश्री फुके, ज्योती भोर आदींनी मोबाईलच्या लोकेशनद्वारे चोरटे शोधून काढले.