भंगारातून नवसाहित्याची निर्मिती !
By Admin | Updated: July 21, 2014 00:22 IST2014-07-20T23:31:23+5:302014-07-21T00:22:39+5:30
लातूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयाने जुन्याला नवा आकार देऊन नवसाहित्य निर्माण केले आहे. यातून लाखो रुपयांची बचत झाली आहे.

भंगारातून नवसाहित्याची निर्मिती !
लातूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयाने जुन्याला नवा आकार देऊन नवसाहित्य निर्माण केले आहे. यातून लाखो रुपयांची बचत झाली आहे.
रुग्णालयातील लोखंडी पलंग, स्ट्रेचर ट्रॉली, बेडसाईड लॉकर आदी साहित्य मोठ्या प्रमाणात नादुरुस्त होते. ते भंगारजमा होते. गेल्या आठ वर्षांपासून हे साहित्य वापराविना पडून होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. दीप्ति डोणगावकर यांनी या संदर्भात समिती स्थापन करून भंगार साहित्याचे सॉर्टिंग केले. त्यातील लोखंडी पलंग, स्ट्रेचर ट्रॉली, साईड लॉकर साहित्य बाजूला काढले. त्याची दुरुस्ती करून नवा आकार दिल्यास पुनर्वापर होऊ शकतो, असे समितीचेही मत तयार झाले. त्यामुळे अधिष्ठातांनी भंगारातून टिकाऊ साहित्य बनविण्याचा उपक्रम हाती घेतला आणि त्याची निविदा काढून प्रस्तुत साहित्य बनविण्याचे काम देण्यात आले. २९ स्ट्रेचर ट्रॉली, १०० बेडसाईड लॉकर, १०० लोखंडी पलंग, ४८ लोखंडी खुर्च्या या भंगारातून तयार करण्यात आल्या आहेत. स्ट्रेचरसाठी प्रतिनग ६९२९ रुपये असा नव्यासाठी खर्च होतो. एकूण २ लाख ७६७ रुपये स्ट्रेचरसाठी खर्च करावा लागला असता. तर १०० कॉटसाठी ९ लाख ८० हजार रुपये आणि बेडसाईड लॉकरसाठी २ लाख ५६ हजार रुपये आणि लोखंडी खुर्च्यासाठी ९६ हजार रुपये असा एकूण १५ लाख ३२ हजार ७६७ रुपये खर्च झाला असता. परंतु, प्रशासनाने जुन्याला नवा आकार देऊन या खर्चाची बचत केली.
टाकाऊपासून टिकावू...
‘टाकाऊपासून टिकावू वस्तू’ महाविद्यालय प्रशासनाने एक वेगळा पॅटर्न निर्माण केला आहे. नव्या साहित्याची मागणी केल्यानंतर त्याची प्रक्रिया किचकट असते. ते वेळेतही मिळत नाही. त्यामुळे समस्या वाढत जाते. त्यामुळे अधिष्ठातांनी पलंग, खुर्च्या, टेबल, स्ट्रेचर या वस्तू भंगारातून तयार केल्या. त्याचे कौतुक होत आहे.
अन्य साहित्यांचा पुनर्वापर...
अन्य भंगार साहित्यातून अनेक नव्या गोष्टी तयार करण्यात आल्या आहेत. औषधी खोक्यासाठी आलेल्या पॅकिंगच्या लाकडी फळ्यांचा नेमप्लेटसाठी वापर करण्यात आला आहे.
शिवाय, औषध विभागाला गोळ्या वितरणासाठी ट्रे बनविण्यात आले आहेत. अधिष्ठातांच्या या उपक्रमाला महाविद्यालयातील डॉ. डोपे, डॉ. कोकणे, डॉ. कांचन भोरगे, डॉ. गोरे, डॉ. अनमोड, हरिश पिंपळकर यांनी साथ दिली आणि हे नवे साहित्य आकाराला आले.