जायकवाडी धरणाच्या उत्तर वसाहतीवरील अतिक्रमणांवर हातोडा; ६० घरे पाडली, कुटुंबे रस्त्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 19:37 IST2025-12-13T19:37:14+5:302025-12-13T19:37:51+5:30
जायकवाडी धरणाच्या उभारणीनंतर १९६७-६८ दरम्यान अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या उत्तर आणि दक्षिण वसाहतीतील घरे मोडकळीस आली आहेत.

जायकवाडी धरणाच्या उत्तर वसाहतीवरील अतिक्रमणांवर हातोडा; ६० घरे पाडली, कुटुंबे रस्त्यावर
पैठण : जायकवाडी धरण परिसरातील अतिक्रमित घरे पाडण्यासाठी पाटबंधारे विभागाने शुक्रवारपासून मोहीम सुरू केली आहे. गेल्या दिवसभरात येथे १५ जेसीबींच्या साहाय्याने शेकडो पोलिसांच्या बंदोबस्तात ६० घरे जमीनदोस्त करण्यात आली. यामुळे अनेक कुटुंबे उघड्यावर आली असून, घरे पडताना पाहून त्यांना अश्रू अनावर झाले होते.
जायकवाडी धरणाच्या उभारणीनंतर १९६७-६८ दरम्यान अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या उत्तर आणि दक्षिण वसाहतीतील घरे मोडकळीस आली आहेत. या ठिकाणी एकही अधिकारी, कर्मचारी राहत नाही, तर येथे काही नागरिक आणि सेवानिवृत्त कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून राहत आहेत. उत्तर वसाहतीतील ४५० आणि दक्षिणेकडील १५० घरे त्यामुळे अतिक्रमित आहेत.
यामुळे येथे पाडकाम करण्यासाठी पाटबंधारे विभागाने या अतिक्रमणधारकांना यापूर्वीच घरे खाली करण्याची नोटीस बजावली होती. मात्र, मुलांच्या दहावी, बारावीचे पेपर जवळ आले असून, पेपर झाल्यानंतर पाडापाडी करा, अशी नागरिकांनी विनंती केली हाेती. मात्र, प्रशासनाने ही विनंती धुडकावून शुक्रवारपासून मोठ्या पोलिस बंदोबस्तात पंधरा जेसीबींच्या साहाय्याने उत्तर भागातून पाडापाडीला सुरुवात केली. यामुळे सकाळपासूनच अनेकांनी आपला पसारा हलवायला सुरुवात केली होती. परिसरात अनेक हॉटेल होती. मात्र, त्यांनी स्वत:हून आपले अतिक्रमण काढून घेतले. घरे पडत असल्यामुळे अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते. महिला व मुलेही रडत होती. दिवसभरात प्रशासनाने ६० घरे पाडली.
स्थगिती मिळविण्यासाठी धावाधाव मात्र उपयाेग झाला नाही
जायकवाडी वसाहतीमधील अतिक्रमण हटविण्याची मोहीम शुक्रवारपासून सुरू होणार असल्यामुळे अनेकांनी आमदार, मंत्र्यांकडे किमान मुलांचे पेपर होईपर्यंत स्थगिती देण्याची विनंती केली होती. यासाठी काहींनी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान मंत्र्यांनाही साकडे घातले. प्रशासनासोबत बैठकही पार पडली. मात्र, स्थगिती मिळाली नाही.
आम्ही घर सोडणार नाही
माझे वडील या ठिकाणी नोकरीला होते. माझा जन्म याच कॉलनीत झाला आहे. मी मागील ४५ वर्षांपासून राहतो. शैक्षणिक वर्ष मार्चनंतर संपेल. त्यानंतर, तुम्ही बिनधास्त अतिक्रमण पाडा. मात्र, आमच्या मुलांच्या भवितव्याचा विचार करून आम्हाला तीन महिने या ठिकाणी राहू द्यावे. कुठल्याही परिस्थितीत आम्ही घर सोडणार नाही.
-गोकुळ देवकाते, रहिवासी.
पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात
या अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी एआयडीसी पोलिस ठाण्याचे सपोनि.ईश्वर जगदाळे यांच्यासह ८ पोलिस अधिकारी, ४७ पोलिस अंमलदार, २८ महिला पोलिस अंमलदार, २ आरसीपी पथक (त्यामध्ये २६ पोलिस अंमलदार) असे एकूण ८ अधिकारी १०१ पोलिस कर्मचारी दिवसभर तैनात होते.