छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना भवनच्या लिफ्टमध्ये अडकले दाम्पत्य, 'अशी' झाली सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 18:40 IST2025-11-07T18:38:39+5:302025-11-07T18:40:02+5:30
विशेष बाब म्हणजे, मागील काही दिवसांत तीन ते चार वेळेस लिफ्ट अडकण्याच्या घटना घडल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना भवनच्या लिफ्टमध्ये अडकले दाम्पत्य, 'अशी' झाली सुटका
छत्रपती संभाजीनगर : औरंगपुरा येथील शिवसेना भवन या इमारतीचा अलीकडेच वापर सुरू करण्यात आला. गुरुवारी दुपारी इमारतीच्या लिफ्टमध्ये एक दाम्पत्य अडकले. लिफ्टमधील आपत्कालीन कॉल, अलार्मही काम करीत नव्हता. शेवटी अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. लिफ्टचे दरवाजे तोडून दाम्पत्याला बाहेर काढण्यात आले. त्यामुळे दाम्पत्यासह उपस्थितांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला. विशेष बाब म्हणजे, मागील काही दिवसांत तीन ते चार वेळेस लिफ्ट अडकण्याच्या घटना घडल्या आहेत.
औरंगपुऱ्यातील नाल्यावर शिवसेना भवन उभारण्यात आले आहे. इमारतीची उभारणी करताना नाल्यावर उंची किती असावी, हा वाद सुरू झाला. त्यानंतर इमारतीला अनेक वर्षे भोगवटा प्रमाणपत्र मिळत नव्हते. त्यामुळे इमारत वापराविना पडून होती. अलीकडे महापालिकेने काही नियम बाजूला ठेवत भोगवटा प्रमाणपत्र दिल्यावर इमारतीचा वापर सुरू झाला. या इमारतीमध्ये विविध दुकाने, व्यावसायिक कार्यालये, कोचिंग क्लासेस सुरू झाले आहेत. गुरुवारी दुपारी महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे कर्मचारी वसीम पठाण पत्नीसह शिवसेना भवनातील दुसऱ्या मजल्यावरील खासगी क्लासेसमध्ये विचारणा करण्यासाठी गेले होते.
जाताना ते लिफ्टने गेले. परत येताना, त्यांची लिफ्ट दुसऱ्या आणि पहिल्या मजल्यामध्ये अडकली. इमर्जन्सी कॉल लागत नव्हता, अलार्म वाजविण्याचा प्रयत्न केला, त्यानंतरही तो वाजत नव्हता. त्यांनी आरडाओरड केली. अनेक प्रयत्न केल्यानंतरही लिफ्ट सुरू झाली नाही. शेवटी अग्निशमन विभागाला माहिती दिली. मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअग्निशमन अधिकारी विजय राठोड, लक्ष्मण कोल्हे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. लिफ्टचे दरवाजे तोडून अडकलेल्या पठाण दाम्पत्याची सुटका केली. यापूर्वी अनेकदा येथे नागरिक अडकल्याच्या घटना घडल्या. आठवडाभरापूर्वी पत्रकारही अडकले होते.
इमारतीत चार लिफ्ट
गुरुवारी बंद पडलेली लिफ्ट बुधवारी दुरुस्त करण्यात आली. गुरुवारपासून वापर सुरू केला होता. इमारतीत एकूण चार लिफ्ट आहेत. मात्र, एकाही लिफ्टला ने-आण करण्यासाठी कर्मचारी ठेवलेला नाही, हे विशेष.