नगरसेवकांनी केली ‘वाटमारी’
By Admin | Updated: July 10, 2014 01:16 IST2014-07-10T01:14:00+5:302014-07-10T01:16:40+5:30
औरंगाबाद : महापालिकेत काही नगरसेवकांची दहशत वाढली आहे. त्यांनी लेखा विभागाच्या शिपायाला काल ८ रोजी महसूल उपायुक्तांच्या दालनाबाहेर मारहाण करून ९ कोटी रुपयांचे धनादेश हिसकावून घेतले.

नगरसेवकांनी केली ‘वाटमारी’
औरंगाबाद : महापालिकेत काही नगरसेवकांची दहशत वाढली आहे. त्यांनी लेखा विभागाच्या शिपायाला काल ८ रोजी महसूल उपायुक्तांच्या दालनाबाहेर मारहाण करून ९ कोटी रुपयांचे धनादेश हिसकावून घेतले. चौर्यकर्म करणाऱ्या त्या नगरसेवकांच्या विरोधात मनपाने पोलिसांत तक्रार दिलेली नाही. शिवाय कोणताही वरिष्ठ अधिकारी या प्रकरणात बोलण्यास तयार नाही. प्रशासन हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चा आहे.
आज सकाळी आयडीबीआय बँकेला पत्र देऊन सर्व धनादेशांचे पेमेंट थांबविले आहे. मात्र, तोपर्यंत धनादेश हिसकावणाऱ्या नगरसेवकांच्या गुत्तेदारांनी ३ कोटी रुपये बँकेतून काढले होते. हा चोरीचा प्रकार असून प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे. शिपाई, लेखा विभागातील अधिकाऱ्यांपासून सर्व वरिष्ठांनी या प्रकरणी कानाला हात लावल्याने सर्व काही संशयास्पद वाटते आहे.
हा सगळा प्रकार लेखा विभागातून धनादेश काढून देण्यासाठी घेतलेल्या सुपारीमुळे घडल्याची चर्चा असून, प्रशासनाच्या मर्जीतील काही (दलाल) नगरसेवकांची काही महिन्यांपासून लेखा विभागात ये-जा वाढली आहे. त्याचा परिणाम म्हणून गेल्या
महिन्यात लेखाधिकाऱ्यांची एका नगरसेवकाबरोबर बाचाबाचीही झाली होती. मनपाची विस्कटलेली आर्थिक घडी सध्या कुठेतरी बसत असतानाच मर्जीतील गुत्तेदारांची बिले काढून देण्यासाठी पालिकेत भाईगिरीचे राज्य आलेले दिसते. मे महिन्यानंतर ५ ते ७ कोटींची रक्कम देण्याचा निर्णय मनपाने घेतल्यामुळे पैशांवर सर्वच तुटून पडल्याने हा प्रकार घडला.
प्रशासनाचे मत असे...
उपायुक्त सुरेश पेडगावकर यांना या प्रकरणी विचारले असता ते म्हणाले की, धनादेशांवर मी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. धनादेशावर स्वाक्षऱ्या केल्यानंतर पुढे काय झाले हे मला माहिती नाही. धनादेश हिसकावल्याची घटना कुठे घडली याची माहिती शिपायाने दिली असती. मात्र, त्याने माझ्याकडे तशी काही तक्रार केलेली नाही.
लेखाधिकारी संजय पवार म्हणाले की, धनादेश संबंधितांच्या नावानेच निघतो. आज सकाळी ‘आयटी डिडक्शन’मुळे बँकेतील पेमेंट थांबविण्यासाठी पत्र दिले होते. ४ वाजेपर्यंत सर्व पेमेंट थांबविण्यात आले होते. धनादेश पळविण्याचा कोणताही प्रकार घडला नसल्याचा दावा त्यांनी केला.
का पळविले धनादेश...
उपायुक्तांनी स्वाक्षऱ्या केल्यानंतर लेखा विभागात धनादेशाची नोंद एका रजिस्टरमध्ये होते. ती नोंद होण्यापूर्वीच बाहेरच्या बाहेर नगरसेवकांनी धनादेश पुस्तिकेतून फाडून घेतले. हा चोरीचाच प्रकार आहे.
अशा पद्धतीमुळे मनपात वेगळ्या प्रकारची दहशत निर्माण होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. धनादेश देण्यासाठी चिरीमिरीचा प्रकार घडत असावा. त्यामुळे धनादेश काढून देण्यासाठी संबंधितांकडून घेतलेली रक्कम आपल्याच पदरात पडावी. यासाठीच लेखा विभागातील शिपायाला अडवून त्याच्याकडील पुस्तकातून धनादेश फाडून घेत नगरसेवकांनी पोबारा केला. मनपाच्या कामकाजात नगरसेवकांनी हस्तक्षेप करणे हे बेकायदेशीर आहे, असेही सूत्राने सांगितले.
पाळत ठेवून केलेला प्रकार
1काल ८ रोजी सायंकाळी लेखा विभागातून धनादेश पुस्तिका घेऊन एक शिपाई उपायुक्त सुरेश पेडगावकर यांच्याकडे गेला. पुस्तिकेत सुमारे सात ते आठ धनादेश लिहिलेले होते. उपायुक्त पेडगावकर यांनी अंदाजे ९ कोटी रुपयांच्या धनादेशांवर स्वाक्षऱ्या केल्या.
2शिपाई उपायुक्तांकडून धनादेश पुस्तिका घेऊन लेखा विभागाच्या दिशेने जाताना त्याला तीन नगरसेवकांनी मध्येच अडविले. धनोदश पुस्तिका त्याच्याकडून हिसकावून घेतली. त्यातील आपल्या मर्जीतील गुत्तेदारांचे धनादेश फाडून घेतले.
3शिपायाने विरोध करण्यास सुरुवात करताच त्याला मारहाणही करण्यात आली. धास्तावलेला शिपाई लेखा विभागात परतला. त्याने वरिष्ठांना घडलेला प्रकार सांगितला. लेखा विभागातील वरिष्ठ आणि नगरसेवकांमध्ये फोनवरून बाचाबाची झाली. आज सकाळी प्रशासनाने काल ८ रोजी जारी केलेले धनादेशांचे पेमेंट थांबविण्यासाठी बँकेला पत्र दिले.
धनादेश सुरक्षित
आयुक्त डॉ.हर्षदीप कांबळे म्हणाले, सर्व धनादेश सुरक्षित आहेत. अनेक धनादेश अदा केले. ते सर्वांना सुरक्षित मिळाले आहेत. एकाचीही तक्रार मनपाकडे आलेली नाही.
लेखाधिकारी-१ संजय पवार यांच्याकडे धनादेश देण्याची जबाबदारी आहे. तत्पूर्वी, एन.जी. दुर्राणींकडे ती जबाबदारी होती. मुख्य लेखाधिकारी अशोक थोरात यांचे संचिका तपासणीचे काम आहे. उपायुक्त पेडगावकर यांच्या स्वाक्षरीनंतर धनादेश दिले जातात.