coronavirus : व्हेंटिलेटर सरकारचे; बिल खाजगी रुग्णालयाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 19:24 IST2020-08-19T19:22:19+5:302020-08-19T19:24:56+5:30

सर्व खाजगी रुग्णालयांवर ऑडिटर नेमण्याची लोकप्रतिनिधींची प्रशासनाकडे मागणी

coronavirus: ventilator government; Bill private hospital | coronavirus : व्हेंटिलेटर सरकारचे; बिल खाजगी रुग्णालयाचे

coronavirus : व्हेंटिलेटर सरकारचे; बिल खाजगी रुग्णालयाचे

ठळक मुद्देपी. एम. केअर फंडातून जिल्ह्याला ६५ व्हेंटिलेटर मिळालेयातील ३० व्हेंटिलेटर खाजगी रुग्णालयांना वाटले

औरंगाबाद : केंद्र शासनाने दिलेले ६५ पैकी ३० व्हेंटिलेटर  तत्कालीन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी खाजगी रुग्णालयांना वाटले आहेत. सरकारी व्हेंटिलेटरवरून ज्या रुग्णांचा उपचार झाला त्यांच्या बिलात त्याची रक्कम आकारण्यात येऊ नये, या अटीवर ते व्हेंटिलेटर देण्यात आलेले असताना खाजगी रुग्णालये बिल आकारत असल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधींनी जिल्हा प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत केल्या. जिल्ह्यातील सर्व खाजगी रुग्णालयांवर आॅडिटर नेमण्याची मागणीदेखील यावेळी करण्यात आली. 

पी. एम. केअर फंडातून जिल्ह्याला ६५ व्हेंटिलेटर मिळाले, ते व्हेंटिलेटर कधी आले, कोणत्या रुग्णालयांना वाटले, याबाबत प्रशासनाला काहीही माहिती नव्हती. वाटप केल्यानंतर जिल्हा प्रशासनासमोर ती बाब आली. जेथे त्या व्हेंटिलेटरची गरज नाही, त्या ठिकाणी ते वाटप करण्यात आले. ज्या रुग्णालयात आयसीयू नाही, तेथे व्हेंटिलेटर दिले. कोरोना रुग्णावर उपचार करण्याची तयारी ज्या हॉस्पिटल्सने दर्शविली, त्यांना ते वाटप करण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून जिल्हा प्रशासनाला सांगण्यात आले. ३ महिन्यांसाठीच ते व्हेंटिलेटर देण्यात आले आहेत. ग्रामीण भागात काही ठिकाणी कोरोनाचे २ किंवा ४ रुग्ण आहेत, तेथे १०-१० व्हेंटिलेटर देण्यात आले. गरज नसलेल्या ठिकाणचे व्हेंटिलेटर काढून घेत त्यातील २५  व्हेंटिलेटर घाटीला देण्यात आले. 

 उर्वरित एमजीएम, सावंगीकर, वायएसके, एमआयटी रुग्णालयांना देण्यात आले आहेत. या रुग्णालयांना अटी व शर्ती टाकून ते व्हेंटिलेटर दिले असून, कोरोना रुग्णांवर उपचार करताना सरकारी व्हेंटिलेटर वापरले तर त्याचे बिल घेण्यात येऊ नये, असे आदेश तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. सोमवारी प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली, पुढच्या सोमवारपर्यंत याबाबत चित्र स्पष्ट होईल, अशी लोकप्रतिनिधींनी नंतर माध्यमांशी बोलताना अपेक्षा व्यक्त केली. 


केवळ पाच खासगी रुग्णालयात रिअल टाईम बिल तपासणी
जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या बैठकीत व्हेंटिलेटर आणि खाजगी रुग्णालयांकडून जास्तीचे बिल आकारण्यात येत असल्याबाबत सोमवारी चर्चा झाली. यामध्ये व्हेंटिलेटर जेथे दिले त्या रुग्णालयांकडून बिल आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी येत आहेत, तसेच केवळ पाच खाजगी रुग्णालयांमध्ये रिअल टाईम बिल तपासणी होत असून, सर्व खाजगी रुग्णालंयावर ऑडिटर नेमला जावा, अशी सूचना जिल्हा प्रशासनाला केल्याचे आ. अंबादास दानवे यांनी सांगितले. 

Web Title: coronavirus: ventilator government; Bill private hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.