coronavirus : मराठवाड्यात रेमडेसिविरसाठी ‘तारेवरची कसरत’; दररोजची गरज सात हजारांची मिळतात दोन हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 19:34 IST2021-05-04T19:33:31+5:302021-05-04T19:34:54+5:30
coronavirus : मराठवाड्यात इंजेक्शनचा तुटवडा असल्यामुळे रुग्णनातेवाईक औरंगाबादपर्यंत धावपळ करीत आहेत, तर दुसरीकडे इंजेक्शनचा काळाबाजार, चोऱ्या होण्याचे प्रमाणही वाढले आहे.

coronavirus : मराठवाड्यात रेमडेसिविरसाठी ‘तारेवरची कसरत’; दररोजची गरज सात हजारांची मिळतात दोन हजार
- विकास राऊत
औरंगाबाद : मराठवाड्यात ३ मे रोजी दुपारपर्यंत सहा हजार ५००च्या आसपास कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा अहवाल विभागीय प्रशासनाने शासनाला सादर केला आहे. विभागात असलेल्या रुग्णांच्या तुलनेत रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा एकाही जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा हतबल आणि हवालदिल झाली आहे, तर इंजेक्शनसाठी रुग्णनातेवाइकांची सर्वत्र धावपळ सुरू असल्याचे चित्र आहे. रोज सात हजार इंजेक्शनची गरज असताना दोन हजार इंजेक्शन्स सध्या येत आहेत. परिणामी पुरवठा आणि मागणीतील तफावतीमुळे यंत्रणेची तारेवरची कसरत सुरू आहे.
मराठवाड्यात इंजेक्शनचा तुटवडा असल्यामुळे रुग्णनातेवाईक औरंगाबादपर्यंत धावपळ करीत आहेत, तर दुसरीकडे इंजेक्शनचा काळाबाजार, चोऱ्या होण्याचे प्रमाणही वाढले आहे. बनावट इंजेक्शनदेखील या महामारीत विकण्याच्या घटना समोर येत आहेत. असे असताना गंभीर रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत इंजेक्शनचा पुरवठा ५० टक्केच होत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे रुग्ण नातेवाईक हताश होत आहेत.
गरज होती एक लाख इंजेक्शनची दिले ३० हजार
मागील पंधरा दिवसांत मराठवाड्याला रोज दोन हजार याप्रमाणे ३० हजार इंजेक्शन मिळाले आहेत. रोज सात हजार इंजेक्शनची विभागाची गरज आहे. त्या तुलनेत फक्त दोन हजार इंजेक्शन मिळत असल्यामुळे तारेवरची कसरत प्रशासकीय यंत्रणेला करावी लागते आहे. सध्या मराठवाड्यात सरकारी दवाखान्यात दहा हजार ३६८ आणि खासगी रुग्णालयात ७०२ इंजेक्शन उपलब्ध आहेत. इंजेक्शन मिळण्यात विभाग मागे आहे, कारण दोन कंपन्यांचा साठा येत आहे.
इंजेक्शन परिणामकारक आहे
डॉ.आशिष देशमुख यांनी लोकमतशी बोलताना सांगितले, रेमडेसिविर इंजेक्शन परिणामकारक आहे. ताप कमी होत नसेल आणि कफ वाढत असेल तर रुग्णाच्या प्रकृतीचे गांभीर्य पाहून पहिल्या दिवशी दोन आणि त्यापुढील तीन दिवस एकेक इंजेक्शनचा डोस देण्यात येतो. पाच ते सहा इंजेक्शन एका रुग्णासाठी लागतात.
विभागात इंजेक्शन मिळण्यात अडचणी
विभागात शासकीय स्टोअरमध्ये कमी प्रमाणात इंजेक्शन सोमवारी उपलब्ध होते. रुग्णसंख्या आणि इंजेक्शन तुलनेते साठा कमी झाल्यामुळे परिस्थिती बिकट असल्याचे अन्न व औषधी विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
जालन्यातून रेमडेसिविर इंजेक्शनचे वाटप
एकट्या जालना शहराला ३० हजार रेमडेसिविर इंजेक्शन देण्यात आल्याचा मुद्दा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुमोटो याचिकेत उपस्थित करण्यात आला. त्यावर सरकारने मान्य केले की, जालन्याला ३० हजार रेमडेसिविर इंजेक्शन देण्यात आले. तेथून इंजेक्शनचा पुरवठा मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
रुग्ण आणि इंजेक्शनची टक्केवारी
एकूण रुग्णांपैकी २५ टक्के गंभीर रुग्णाचा अंदाज आहे. सहा हजार ५०० रुग्णांच्या तुलनेत आजच्या स्थितीला पहिला डोस देण्यासाठी १५०० इंजेक्शन विभागाला आवश्यक आहेत. पाच दिवसांचे डोस मिळून ७ ते ८ हजार इंजेक्शन विभागात असणे आवश्यक आहे. परंतु सोमवारी कुठेही इंजेक्शन उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आल्याने परिस्थिती बिकट झाल्याचे दिसते आहे.
विभागीय आयुक्तांनी काय प्रयत्न केले
बेड्स, ऑक्सिजन आणि इंजेक्शन उपलब्धतेसाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर सर्व यंत्रणेच्या संपर्कात आहेत. त्यांनी विभागाला जास्तीत जास्त इंजेक्शनचा साठा मिळावा यासाठी अन्न व औषधी विभागाच्या वरिष्ठांकडेदेखील मागणी केली. मराठवाड्यात इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी रेमडेसिविरचे इन्चार्ज विजय वाघमारे यांच्याकडून जास्तीचा साठा मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. सर्व विभागासह अहमदनगरसाठी इंजेक्शनचा साठा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दररोज २५० ते ३००च्या वर इंजेक्शन पुरवठा केला जात नाही.
मराठवाड्यातील ३ मे दुपारपर्यंतची रुग्णसंख्या
रुग्णसंख्या शहर ग्रामीण
औरंगाबाद- ------- ३७३- ४६२
जालना---------- ००० -८९८
परभणी--------- ४३६ -३८५
हिंगोली--------- ००० -२४९
नांदेड---------- १३६- ३५८
बीड----------- ००० -१३४५
लातूर---------- २७९ -७४८
उस्मानाबाद------ ००० -५८७
एकूण --------- १२२४ -५०३२