घराशेजारीच खरेदी करा; खरेदीसाठी वाहन घेऊन बाहेर पडाल, तर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 19:59 IST2020-05-28T19:59:10+5:302020-05-28T19:59:50+5:30
जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत अवधी देण्यात आला आहे.

घराशेजारीच खरेदी करा; खरेदीसाठी वाहन घेऊन बाहेर पडाल, तर कारवाई
औरंगाबाद : जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी पायीच घराबाहेर पडणे आवश्यक आहे. खरेदीच्या नावाखाली घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची वाहने जप्त केली जातील, असा इशारा पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी आज दिला.
पोलीस आयुक्त कार्यालयात कोरोना स्थितीविषयी पोलीस आयुक्तांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपायुक्त मीना मकवाना, सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे उपस्थित होते. आयुक्त म्हणाले की, शहरातील कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत अवधी देण्यात आला आहे. या कालावधीत मोठ्या संख्येने लोक बिनधास्तपणे वाहने घेऊन घराबाहेर पडतात. नागरिकांना त्यांच्या कॉलनीत किंवा घराजवळ जीवनावश्यक वस्तू उपलब्ध असताना अनेकजण दुचाकी घेऊन खरेदीच्या नावाखाली घराबाहेर पडतात. यामुळे गर्दी होते आणि कोरोनाचा संसर्ग पसरण्याचा धोका वाढतो. यामुळे दुचाकीच्या हँडलला पिशवी लटकावून घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे वाहन जप्त केले जाणार आहे. प्रशासनाने सलग सहा दिवस संपूर्ण लॉकडाऊन केले. त्याचा परिणाम चांगला झाल्यामुळे कोरोना संसर्ग आटोक्यात आल्याचे पोलीस आयुक्तांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले. कोरोनाचा प्रादुर्भाव काही काळ राहणार असून आगामी काळातही नागरिकांनी मास्क वापरणे आणि शारीरिक अंतर राखणे हा नियम कायमस्वरुपी पाळावा लागेल, असे ते म्हणाले.
वसाहतीतच जीवनावश्यक वस्तू खरेदी करा
कोरोना महामारीला आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक नागरिकाने त्याच्या वसाहतीत अथवा परिसरातच जीवनावश्यक वस्तू खरेदी केल्या पाहिजेत.
सिडको अथवा गारखेड्याचा माणूस वाहन घेऊन गुलमंडीवर अथवा गुलमंडीच्या नागरिकाने कॅनॉट प्लेसमध्ये खरेदीसाठी जाऊ नये. याकरिता लवकरच नियमावली आणली जाईल, असे ते म्हणाले. याशिवाय नागरिकांनी गर्दी करू नये. मास्क वापरावा आणि सहा फुटांपर्यंत शारीरिक अंतर राखावे, असे आवाहन त्यांनी केले.