coronavirus : लॉकडाऊनमध्ये लिकेज; रामनगर कोरोनाबाधित का झाले ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 16:39 IST2020-05-12T16:34:03+5:302020-05-12T16:39:21+5:30
संजयनगर भागात अगोदरच मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेले असताना हा परिसर १०० टक्के लॉकडाऊन केला नव्हता.

coronavirus : लॉकडाऊनमध्ये लिकेज; रामनगर कोरोनाबाधित का झाले ?
औरंगाबाद : रामनगर, मुकुंदवाडी भागात मागील २ दिवसांमध्ये तब्बल ४१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले तर एका ८० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. रामनगर कोरोनाबाधित का बनले, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. रामनगरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या संजयनगर भागात अगोदरच मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेले असताना हा परिसर १०० टक्के लॉकडाऊन केला नव्हता. आता रामनगरमध्ये सलग सहा दिवस लॉकडाऊन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
रामनगर, विठ्ठलनगर, प्रकाशनगर, म्हाडा कॉलनीत सर्वसामान्य गोरगरीब आणि विविध कंपन्यांतील कामगार मोठ्या संख्येने राहतात. मागील दोन महिन्यांमध्ये हा भाग कोरोनापासून दूर होता. या वसाहतीपासून हाकेच्या अंतरावरील संजयनगरात ७० पेक्षा अधिक बाधित रुग्ण आढळून आले होते. मात्र, हा परिसर दर्शनी भागात पुरताच बंद करण्यात आला. पाठीमागील परिसर जशास तसा होता. संजयनगर भागातील अनेक नागरिक वेगवेगळ्या मार्गाने रामनगरमध्ये दाखल होत असत. या भागातील एका किराणा होलसेल दुकानावर गर्दी होत होती. याकडे प्रशासन आणि नागरिकांनीही फारसे लक्ष दिले नाही.
रामनगरमध्ये कोरोनाचा प्रवेश
रामनगरातील एक ८० वर्षीय वृद्ध छोटीशी दुकान चालवत होते. या दुकानात तंबाखूजन्य पदार्थ व इतर चिप्स घेण्यासाठी तरुण गर्दी करीत असत. तरुणांनी गुटखा खाऊन परिसरात पिचकाऱ्या मारल्या होत्या. सदरील वयोवृद्ध नागरिकाला सर्वात अगोदर कोरोनाची लागण झाली. त्यांच्या पत्नीचा अहवाल निगेटिव्ह आला. मात्र, आसपासच्या तब्बल ४१ नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे आज उघड झाले. यामुळे भीतीचे वातावरण असल्याचे माजी महापौर बापू घडमोडे यांनी सांगितले. पालिकेने निर्जंतुकीकरण करायला हवे, अशी मागणी त्यांनी केली.
प्रत्येक गल्लीत लॉकडाऊन हवे
रामनगर भागातील सर्वच वसाहतींमध्ये अत्यंत छोट्या छोट्या गल्ल्या आहेत. या गल्लीतील नागरिक त्या गल्लीत सहजपणे ये-जा करू शकतात. ही प्रक्रिया प्रशासनाला पूर्णपणे थांबवावी लागेल. परिसरात किमान सहा दिवस १०० टक्के लॉकडाऊन करायला हवे. मेडिकल दुकाने आणि दूध या दोन वस्तू वगळता इतर कोणत्याही सामानाचा पुरवठा न केल्यास कोरोना विषाणूंची साखळी ब्रेक करता येईल, असे घडमोडे यांनी नमूद केले.