CoronaVirus : खेळ अपूर्ण राहिला; ऑक्सिजन बेड वेळेवर न मिळाल्याने राष्ट्रीयस्तरावरील खेळाडूचे कोरोनामुळे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 12:54 IST2021-05-15T12:53:53+5:302021-05-15T12:54:14+5:30
CoronaVirus: नाशिक येथे बेड उपलब्ध नसल्याने शेवटी त्याला घरीच उपचार घ्यावे लागले.

CoronaVirus : खेळ अपूर्ण राहिला; ऑक्सिजन बेड वेळेवर न मिळाल्याने राष्ट्रीयस्तरावरील खेळाडूचे कोरोनामुळे निधन
सोयगाव : योग्यवेळी ऑक्सिजन बेड न मिळाल्याने नाशिक येथे सोयगाव येथील शुटींग व्हॉलीबॉलमधील राष्ट्रीय खेळाडू सुशील सुनील पाटील याचे अवघ्या २४ व्या वर्षी कोरोनामुळे निधन झाले. या घटनेमुळे क्रीडा विश्वात हळहळ व्यक्त होत आहे. याची वार्ता सोयगावात धडकताच शहरात शोककळ पसरली होती.
सुशीलला दि.२२ एप्रिलला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते,त्याचा एच.आर.सी.टी स्कोर एक होता. नाशिकला उपचार घेण्याचा विचार केला. परंतु, बेड उपलब्ध नसल्याने शेवटी त्याला घरीच उपचार घ्यावे लागले. सुशीलला श्वास घेण्यास त्रास व्होऊ लागल्याने ओझरमधील खासगी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, त्याठिकाणी उपचारा यंत्रणा अपूर्ण होती, ऑक्सिजनही उपलब्ध नव्हता. यामुळे दि.२८ एप्रिलला त्याला नाशिकच्या एस.एम.बी.टी वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ.नीरज मोरे, डॉ. रुचिरा, डॉ. पटेल त्याच्यावर उपचार करत होते. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे महागडी औषधी उपलब्ध करून देण्यात आली.
सुशीलच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. परंतु, दि .३ मे रात्री बारा वाजेच्या सुमारास हृदय विकाराचा झटका आल्याने सुशीलचे निधन झाले. बी.एस्सी अग्रीचा पदवीधर असलेल्या सुशीलला क्रीडा क्षेत्रात चुणूक दाखवून सोयगावचा नावलौकिक वाढविण्याची इच्छा होती. त्याला वेळेवर बेड मिळाला असता तर चित्र वेगळे राहिले असते अशी खंत अजूनही सुशीलच्या कुटुंबियांना वाटते. घरचा सधन, कोटीचा विमा आणि कुटुंबियांची खर्च करण्याची तयारी असूनही केवळ वेळेवर बेड न मिळाल्याने ओझर ते नाशिक धावपळ करावी लागल्याने एका राष्ट्रीय खेळाडूला आयुष्याचा खेळ २४ व्या वर्षी सोडावा लागला.
औषधांचा काळाबाजार सुरूच आहे
शासन पातळीवर एका राष्ट्रीय खेळाडूसाठीही बेड उपलब्ध नव्हता ही अत्यंत खेदजनक बाब आहे. नाशिक शहरासह राज्यात आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा वाजले आहेत. सरकारी यंत्रणेच्या कमजोरीमुळे सुशील सारख्या खेळाडूचा मृत्यू झाला आहे. रेमडेसिविर व टोसिलीझुमब इंजेक्शनचा राज्यभर काळाबाजार सुरूच आहे. याकडे शासन पातळीवरून लक्ष नसून रेमडेसिविर २५ हजार रु आणि टोसिलीझुमब दोन ते अडीच लक्ष रुपये मोजून घ्यावे लागत आहे. सुशीलच्या उपचारासाठी धावपळ करतांना हा अनुभव आम्ही घेतला असे मृत सुशीलचे काका सोयगावचे माजी उपनगराध्यक्ष योगेश पाटील यांनी सांगितले. मात्र, शासनाला याचे गांभीर्य नसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.