coronavirus कोरोनाची भीती; शहरातील वसतिगृहांतील विद्यार्थी निघाले गावाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 04:31 PM2020-03-18T16:31:28+5:302020-03-18T16:37:53+5:30

औरंगाबादेतही दोन दिवसांपासून संशयित ५ व्यक्ती असून, एक जण पॉझिटिव्ह आढळून आला आहे.

coronavirus fears; Students from the city hostels headed to the village | coronavirus कोरोनाची भीती; शहरातील वसतिगृहांतील विद्यार्थी निघाले गावाकडे

coronavirus कोरोनाची भीती; शहरातील वसतिगृहांतील विद्यार्थी निघाले गावाकडे

googlenewsNext
ठळक मुद्दे शासनाच्या आदेशानुसार महाविद्यालयांचा निर्णय मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वेस्टेशनवर गर्दी

औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर समाजकल्याण विभाग, आदिवासी विभागासह विविध खाजगी महाविद्यालये, शाळा, संस्थांची वसतिगृहे रिकामी करण्याचा निर्णय घेण्यात आला. परिणामी, मंगळवारी सकाळपासूनच वसतिगृहातील विद्यार्थ्यांची गावाकडे जाण्याची लगबग सुरू होती. 

जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूने महाराष्ट्रातही शिरकाव केला आहे. यामुळे पुणे, मुंबईसह अन्य मोठ्या शहरांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्ती आढळून आल्या आहेत. औरंगाबादेतही दोन दिवसांपासून संशयित ५ व्यक्ती असून, एक जण पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तथापि, या विषाणूच्या प्रादुर्भावाला वेळीच आळा घालण्यासाठी शासनाने शाळा, महाविद्यालये, मॉल्स, चित्रपटगृहे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. वसतिगृहांमध्ये अनेक मुले राहत असल्यामुळे ती खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील समाजकल्याण विभागाची एक हजार क्षमता असलेल्या किलेअर्क येथील मोठ्या वसतिगृहांसह मुला-मुलींची १९ वसतिगृहे रिकामी केली जात आहेत.

याशिवाय शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, देवगिरी महाविद्यालय, पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालय, मिलिंद महाविद्यालय, स.भु. महाविद्यालय, विद्यापीठ आदी विविध शैक्षणिक संस्थांनीदेखील वसतिगृहे खाली करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मंगळवारी वसतिगृहांतील अनेक विद्यार्थी गावाकडे गेले, तर काही जण उद्या व परवा जातील. परवापर्यंत सर्व वसतिगृहे खाली होतील, असे काही प्राचार्यांनी सांगितले.
गावाकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी बसस्थानकावर सकाळपासूनच गर्दी केली होती. हातात बॅगा घेऊन बसमध्ये चढण्यासाठी विद्यार्थ्यांची धांदल उडाली होती. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर गावी जाण्याचा आनंद, तर दुसरीकडे परीक्षेची चिंता दिसत होती. रेल्वेस्टेशनवरही विद्यार्थ्यांची गर्दी होती. बसस्थानक, रेल्वेस्टेशनवर जाण्यासाठी सर्वच वसतिगृहांसमोर रिक्षांनी गर्दी केली होती, तर अनेक विद्यार्थी बॅगा घेऊन रिक्षांची वाट पाहत होते. विद्यापीठातील वसतिगृहांसमोर विद्यार्थी-विद्यार्थिनी ताटकळत उभे असल्याचे चित्र होते. 

सर्व वसतिगृहे दोन दिवसांत रिकामी होतील
समाजकल्याण विभागाच्या सीमा शिंदीकर यांनी सांगितले की, जिल्ह्यात समाजकल्याण विभागामार्फत मुलांची १०, तर मुलींची ९ वसतिगृहे सुरू आहेत. यातील सर्व मुलांना वसतिगृहे रिकामी करण्याच्या सूचना दिल्या असून, आम्ही प्रत्यक्ष निगराणीखाली मुलांना गावी पाठवीत आहोत. दोन दिवसांत सर्व वसतिगृहे रिकामी होतील. काही जणांची आज परीक्षा होती, तर काही मुलांचे बस व रेल्वेचे आरक्षण उद्याचे, परवाचे आहे. तेवढीच मुले सध्या वसतिगृहांमध्ये आहेत. 

शहरातील सर्व धर्मगुरूंना आवाहन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे नियमित धार्मिक विधी वगळता पुढील दोन आठवडे भाविकांना दर्शनास बंद ठेवावीत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. धार्मिक स्थळ परिसरात भाविकांची गर्दी होऊ नये, यासाठी मशिदीतून एकत्रित नमाज अदा करण्याऐवजी घरीच नमाज अदा करण्याचे आवाहन केल्यास नागरिक एकत्रित होण्यापासून परावृत्त होतील. चर्च, गुरुद्वारा, बुद्धविहार तसेच इतर सर्व धार्मिक प्रार्थनास्थळे याठिकाणीदेखील अत्यावश्यक धार्मिक कार्य वगळता, लोक एकत्रित येतील, असे सर्व कार्यक्रम टाळावे.

विद्यापीठ ग्रंथालय बंद ठेवण्याचा निर्णय
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  ग्रंथालय बंद करून सर्व विभागांचे अध्यापनही बंद के ले आहे. सर्वच वसतिगृहांतील जवळपास ९० टक्के विद्यार्थी मंगळवारी सायंकाळपर्यंत घरी पाठविले आहेत, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी सांगितले. कुलगुरू म्हणाले की, विद्यापीठात सभा, संमेलने, आंदोलने प्रतिबंधित के ली आहेत. प्राध्यापकांना २६ मार्चपर्यंत घरी राहून कामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मंगळवारपासून सुरू होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती २६ मार्चपर्यंत आटोक्यात आली, तर १ किंवा २ एप्रिलपासून परीक्षा घेतल्या जातील. या घडामोडी विद्यार्थ्यांना मेल आयडी, मोबाईलवर कळविल्या जातील. अधिसभेची दि.२७ मार्चची बैठक आता एप्रिलमध्ये होईल. काही विद्यार्थी दूरचे आहेत. काहींचे आरक्षण उद्या तसेच परवाचे आहे, त्यामुळे परवापर्यंत सर्व वसतिगृहे रिकामे होतील. शासनाच्या आदेशानुसार विद्यापीठात फक्त कुलगुरू, तसेच शिक्षकेतर कर्मचारीच कामावर असतील. विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये अनावश्यक प्रवेश बंद आहेत. महत्त्वाच्या कामासाठी येणाऱ्या अभ्यागत किंवा कर्मचाऱ्यांसाठी प्रवेशद्वारातच सॅनिटायझर ठेवले असून, त्याने हात स्वच्छ केल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही.  

जून-जुलै अखेरपर्यंत पेट 
कुलगुरू म्हणाले की, ‘पेट’साठी या महिनाअखेरपर्यंत परीक्षा एजन्सी निश्चित केली जाईल. आता एम.फिल. आणि पीएच.डी.साठी एकच परीक्षा राहील. पहिला पेपर पास होणारा विद्यार्थी एम.फिल.साठी पात्र राहील, तर दोन्ही पेपर उत्तीर्ण होणारा विद्यार्थी पीएच.डी. किंवा एम.फिल. करू शकतो. 

Web Title: coronavirus fears; Students from the city hostels headed to the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.