coronavirus: कोरोनामुळे २९ दिवसांच्या बाळाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 09:39 IST2021-03-31T09:38:53+5:302021-03-31T09:39:16+5:30

जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत असून, घाटी रुग्णालयात  उपचार सुरू असताना अवघ्या २९ दिवसांच्या कोरोनाग्रस्त बाळाचा आणि ६ महिन्यांच्या मुलीचा २९ मार्च रोजी  मृत्यू झाला.

coronavirus :29-day-old baby dies by corona | coronavirus: कोरोनामुळे २९ दिवसांच्या बाळाचा मृत्यू

coronavirus: कोरोनामुळे २९ दिवसांच्या बाळाचा मृत्यू

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत असून, घाटी रुग्णालयात  उपचार सुरू असताना अवघ्या २९ दिवसांच्या कोरोनाग्रस्त बाळाचा आणि ६ महिन्यांच्या मुलीचा २९ मार्च रोजी  मृत्यू झाला. हे दोन्ही शिशू कन्नड येथील रहिवासी आहेत. यासह एका १४ वर्षीय मुलाचाही कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती घाटी प्रशासनाने दिली. आतापर्यंत केवळ ज्येष्ठांना धोका असल्याचे सांगितले जात होते; परंतु या तीन लहानग्यांच्या मृत्यूने आरोग्य यंत्रणेसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. 

२९ दिवसांचे बाळ २८ मार्च रोजी अतिगंभीर अवस्थेत दाखल झाले होते आणि त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. रुग्णाच्या पालकांची कोरोनाची चाचणी करण्यात आली असून, त्याचे वडील कोविड पॉझिटिव्ह  आहेत. त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत. या शिशूला हार्ट डिसिस होता. 
त्याबरोबरच  ६ महिने वयाच्या कोरोनाग्रस्त मुलीला २७ मार्च रोजी गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले होते. मृत्यूचे कारण सिव्हिअर ब्रॉन्कोन्यूमोनिया विथ ॲक्युट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम, सेप्टिक शाॅक, डिस्सेमिनेटेड इन्ट्राव्हॅस्क्युलर कोअ‍ॅग्युलेशन, कोविड-१९ असे आहे.    
तसेच औरंगाबादेतील ज्युबिली पार्क येथील १४ वर्षांच्या मुलाला २३ मार्च रोजी भरती करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यानेही सोमवारी अखेरचा श्वास घेतला. 

लहान मुलांत सौम्य स्वरूपाची लक्षणे दिसून येत होती;  पण गेल्या काही दिवसांत ३ ते ४ बालके गंभीर अवस्थेत दाखल झाली. २९ दिवसांचे आणि ६ महिन्याचे शिशू दाखल होतानाच त्यांची प्रकृती गंभीर होती. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांना आई-वडिलांकडून संसर्ग झाल्याची शक्यता असू शकते.
- डाॅ. प्रभा खैरे, बालरोग विभागप्रमुख, घाटी 

कोरोना रुग्णाचा स्वच्छतागृहात मृत्यू
nऑक्सिजनवर असलेला कोरोना रुग्ण स्वच्छतागृहात गेला. मात्र, अचानक स्वच्छतागृहातच रुग्णाची प्रकृती खालावली. बराच वेळ तो बाहेर आला नसल्याचे लक्षात येताच दरवाजा तोडून रुग्णाला बाहेर काढून आयसीयूत हलविण्यात आले. मात्र, दुर्दैवाने रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे जिल्हा सामान्य रुग्णालयात घडली.  रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला.

Web Title: coronavirus :29-day-old baby dies by corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.