CoronaVirus : कुटुंबाच्या ओढीने १९ परप्रांतीय मजूर कॅम्पमधून पळाले, १५ जणांना परत आणण्यात यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 11:37 IST2020-04-18T11:36:34+5:302020-04-18T11:37:15+5:30
१४ दिवसांचा कालावधी होऊन गेला तरीही सोडण्याबाबत प्रशासनाकडून कसल्याही हालचाली दिसून येत नसल्यामुळे १९ परप्रांतीय तरुण गुपचूप निघून गेले.

CoronaVirus : कुटुंबाच्या ओढीने १९ परप्रांतीय मजूर कॅम्पमधून पळाले, १५ जणांना परत आणण्यात यश
औरंगाबाद : कुटुंबाला भेटण्यासाठी आतूर झालेले क्वारंटाइन मजुरांच्या कँपमधून पळून गेलेल्या १९ पैकी १५ तरुणांना परत आणण्यात पोलिसांना यश आले.
औरंगाबादपासून दोन- तीन किलोमीटर अंतरावर भालगाव आहे. तेथे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. बाळासाहेब पवार यांचे शरदचंद्र पवार आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय आहे. जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार तेथील वसतिगृहात दुसऱ्या जिल्ह्यातील तसेच परप्रांतीय मजुरांची निवास, भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आलेली आहे.
मार्च महिन्यात लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर परप्रांतीय मजूर गावाकडे परतण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी जळगाव येथे मार्केटिंगचे काम करणारे सातारा, सांगली जिल्ह्याचे १८-२० तरुण गावाकडे निघाले व ते औरंगाबादेत अडकले. त्या स्थलांतरित मजुरासह या तरुणांना महापालिका प्रशासनाने गारखेडा परिसरातील एका शाळेत ठेवले होते; परंतु तेथे या लोकांची गैरसोय होत असल्याची ओरड झाल्यामुळे त्या सर्वांची व्यवस्था मग भालगाव येथे वसतिगृहातकरण्यात आली.
१४ दिवसांचा कालावधी होऊन गेला तरीही त्यांना सोडण्याबाबत प्रशासनाकडून कसल्याही हालचाली दिसून येत नसल्यामुळे शुक्रवारी पहाटेच्या सुमारास तेथून ते १९ तरुण गुपचूप निघून गेले. ही बाब सकाळी निदर्शनास आल्यानंतर चिकलठाणा ठाण्याचे निरीक्षक महेश आंधळे व सहकारी कर्मचाऱ्यांनी पैठण, शेवगाव, नेवासा, कर्जत आदी ठिकाहून परत आणले व त्याच वसतिगृहात नेऊन ठेवले.