सेलिब्रेशन भोवले; पोलिस येताच कार्यकर्ते फरार तर बर्थडे बॉय भावी नगरसेवक पोलीस ठाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 14:59 IST2021-03-15T14:58:08+5:302021-03-15T14:59:43+5:30
corona virus कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असताना शुक्रवारी रात्री पैठण शहरातील नवीन कावसान भागात वाढदिवस साजरा करणाऱ्या भावी नगरसेवकासह कार्यकर्त्यांवर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सेलिब्रेशन भोवले; पोलिस येताच कार्यकर्ते फरार तर बर्थडे बॉय भावी नगरसेवक पोलीस ठाण्यात
पैठण : ‘वाढदिवस आहे भावाचा आणि जल्लोष साऱ्या गावाचा’ म्हणत भावी नगरसेवकाच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी पोलीस येताच धूम ठोकली; परंतु बर्थडे बॉय एकटाच पोलिसांच्या तावडीत सापडल्याने त्यास वाढदिवस पोलीस ठाण्यात साजरा करावा लागला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असताना शुक्रवारी रात्री पैठण शहरातील नवीन कावसान भागात वाढदिवस साजरा करणाऱ्या भावी नगरसेवकासह कार्यकर्त्यांवर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पैठण नगर परिषदेची निवडणूक वर्षभरावर आल्याने अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. त्यामुळे शहरातील बहुतांश भागात सध्या भावी नगरसेवक प्रकट होत आहेत. चाणाक्ष कार्यकर्ते अनेकांना भावी नगरसेवक बनवून आपली सोय करण्यातही अनेक जण पुढे आहेत. पैठण शहरातील नवीन कावसान भागात राहणाऱ्या गणेश खेडकर या तरुणास परिसरातील नागरिकांनी भावी नगरसेवक म्हणून पदवी बहाल करून टाकली आणि तोही भावी नगरसेवक म्हणून वाॅर्डात फिरू लागला. शुक्रवारी त्याचा वाढदिवस असल्याने राजकारणात एन्ट्री मारण्यासाठी तो जोरात साजरा करण्याचा सल्ला मित्रमंडळीने त्यास दिला होता.
शहरभर गणेशचे भावी नगरसेवक म्हणून डिजिटल बॅनर लावत वाढदिवस साजरा करण्यासाठी केक, हार, बुके, खुर्च्या, कार्यक्रमाचे बॅनर, अल्पोपहार, फटाके आदींची तजवीज सुद्धा करण्यात आली. बर्थडे बॉयचे कार्यक्रमस्थळी आगमन होताच भावी नगरसेवक म्हणून कार्यकर्त्यांनी घसा ताणून जोरदार घोषणाबाजी केली. काही उत्साही कार्यकर्त्यांनी अवकाशात फुटणारे रंगीत फटाके फोडले आणि घात झाला. नेमके त्यावेळेस गोल नाका परिसरात पोलिसांची गाडी गस्तीवर असल्याने कोण फटाके फोडत आहे, याचा माग घेत फौजदार रामकृष्ण सागडे यांच्यासह पोलीस वाढदिवसाच्या ठिकाणी पोहचले आणि पळापळ सुरू झाली. पोलिसांना पाहताच प्रथम कार्यकर्ते फरार झाले. तोवर गणेशला आलेल्या संकटाची चाहूल लागली होती. पोलिसांनी बर्थडे बॉयला पोलीस ठाण्यात आणले.
बर्थडे बॉयसह १५ जणांवर गुन्हा
वाढदिवसाचा कार्यक्रम कार्यकर्त्यांनी ठेवल्याचे बर्थडे बॉयने सांगत दुसरी आफत स्वत:वर ओढून घेतली. यामुळे वाढदिवस कोणी ठेवला त्यांची नावे अखेर गणेश खेडकरला पोलिसांना सांगावी लागल्याच्या त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. गणेशने पोलीस ठाण्यात आपले नाव सांगितले म्हणून संबंधित कार्यकर्तेही गणेशवर चांगलेच डाफरले असल्याचे पुढे येत आहे. विरोधकांनी मुद्दाम आकाशात फुटणारे फटाके वाजवून गणेशचा गेम केल्याची चर्चा वॉर्डात सुरू आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी गणेश खेडकरसह अन्य १५ जणांविरोधात पैठण ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.