corona virus : मृत्यूची ‘चेन ब्रेक’ होईना ! औरंगाबादेत रुग्णसंख्या घटली तरी मृतांची संख्या घटेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 17:53 IST2021-05-15T17:51:23+5:302021-05-15T17:53:40+5:30
corona virus : मार्च महिन्यात २९२, एप्रिल महिन्यात ४२३ नागरिकांचा बळी कोरोनाने घेतला.

corona virus : मृत्यूची ‘चेन ब्रेक’ होईना ! औरंगाबादेत रुग्णसंख्या घटली तरी मृतांची संख्या घटेना
औरंगाबाद : कोरोनाचे १५ हजार सक्रिय रुग्ण असतानाही जिल्ह्यात मृत्यूची संख्या जेवढी होती तेवढी आजही कायम आहे. रुग्णसंख्या कमी झाली असली तरी मृत्यू सत्राची चेन ब्रेक होण्यास तयार नाही. त्यामुळे आरोग्य विभागाच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडत आहे. कोरोनाचे मृत्यूसत्र अखेर रोखावे तरी कसे असा प्रश्न यंत्रणेला पडला आहे. मृत्यूदरात दररोज औरंगाबाद जिल्ह्याचा क्रमांक राज्यात तिसरा किंवा चौथा असतो.
मार्च आणि एप्रिल महिन्यात कोरोना मृत्यू सत्राने अक्षरशः तांडव घातले. मार्च महिन्यात २९२, एप्रिल महिन्यात ४२३ नागरिकांचा बळी कोरोनाने घेतला. कोरोना संशयित मृत्यूची संख्या वेगळी करण्यात येते. ती यापेक्षा कितीतरी पट अधिक असून भयावह आहे. मार्च महिन्यात ७१९ संशयित, एप्रिलमध्ये १७६२ कोरोना संशयितांचा मृत्यू झाल्याची नोंद महापालिकेच्या दप्तरी आहे. मे महिन्यातही मृत्यू सत्र थांबायला तयार नाही. विशेष बाब म्हणजे शहरातील खासगी आणि शासकीय रुग्णालयांमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या अत्यंत कमी झालेली आहे. शहरात सध्या १३४३ सक्रिय रुग्ण आहेत.
२ हजार ८४५ जणांचा मृत्यू
जिल्ह्यात मागील १५ महिन्यांमध्ये २ हजार ८४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरातील १ हजार ७२७ रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. आजही शहरात दररोज ५० ते ७० रुग्णांचा मृत्यू होत आहे. त्यातील कोरोना म्हणून २२ ते २५ जण, उर्वरित मृत्यू संशयित म्हणून नोंद घेण्यात येते.
दुसऱ्या लाटेत संसर्ग गंभीर
पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत रुग्ण अधिक गंभीर होत आहेत. औषधोपचार करण्यासाठी फारसा वेळ मिळत नाही. गंभीर निमोनिया असलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याने मृत्यूची संख्या वाढलेली आहे. आता कमी वय असलेले रुग्णही दगावत आहेत.
- डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी मनपा.
मे महिन्यातील मृत्यू
तारीख- मृत्यूसंख्या
१३ - २२
१२ - २७
११ - १७
१० - २४
०९ - २२
०८ - २४
०७ - २६
०६ - २५
०४ - २८
०४ - ४३
०३ - ३१
०२ - २८
०१ - १७
शहरातील सक्रिय रुग्णस्थिती
घाटी-७३
सिव्हिल -८२
खासगी रुग्णालये -१३२
मेल्ट्रॉन हॉस्पिटल - १२२
कोविड केअर सेंटर- ४२१
होम आयसोलेशन - ५२३