Corona Virus : विनाकारण घराबाहेर पडाल तर पासपोर्ट, व्हिसाला मुकाल; पोलीस नोंदवित आहेत गंभीर गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 15:02 IST2021-05-11T14:58:34+5:302021-05-11T15:02:49+5:30
Corona Virus in Aurangabad : हे गुन्हे सहजासहजी परत घेता येणे शासनाला शक्य होणार नाही, यासाठी ही काळजी घेतली जात असल्याचे सूत्राने सांगितले.

Corona Virus : विनाकारण घराबाहेर पडाल तर पासपोर्ट, व्हिसाला मुकाल; पोलीस नोंदवित आहेत गंभीर गुन्हे
औरंगाबाद: लॉकडाऊन आणि संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कलम १८८ (सरकारी अधिकाऱ्याच्या आदेशाची अवहेलना करणे) या गुन्ह्यासोबत आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करणे, साथरोगाचा प्रसार करून इतरांचा जीव धोक्यात घालणे कलम २६९ आणि कलम २७० नुसार गुन्हे दाखल केले जात आहे. गंभीर स्वरूपाचे ही कलमे असल्यामुळे त्याचे गंभीर परिणामही नागरिकांना भोगावे लागू शकतात. शासनाने ठरवले तरी ही गुन्हे सहजासहजी परत घेतले जाऊ शकत नाहीत.
वाढत्या कोविड संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी गतवर्षी देशभर लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. गतवर्षी कोविडची प्रचंड भीती नागरिकांच्या मनात होती. ही बाब लक्षात घेऊन विनापरवानगी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कलम १८८ नुसार (लोकसेवकांच्या आदेशाचे पालन न करणे) तब्बल २ हजार १४९ गुन्हे शहर पोलिसांनी नोंदविले. मात्र तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे गुन्हे परत घेण्याची घोषणा केली होती. दरम्यान, त्यांचे पद गेले आणि गुन्हे परत घेण्याविषयी कोणतेही आदेश पोलीस प्रशासनाला प्राप्त झालेले नाहीत. असे असले तरी कलम १८८ सारखी किरकोळ स्वरुपाचे गुन्हे शासन सहज परत घेऊ शकते ही बाब लक्षात घेऊन शहर पोलिसांनी कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिक आणि व्यापाऱ्यांवर कलम १८८ सोबतच कलम २६९, २७० आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करणे आदी गंभीर स्वरूपाचे कलमे लावून गुन्हा नोंद करीत आहेत. हे गुन्हे सहजासहजी परत घेता येणे शासनाला शक्य होणार नाही, यासाठी ही काळजी घेतली जात असल्याचे सूत्राने सांगितले.
व्हिसाही नाकारला जाऊ शकतो
पोलिसांकडून नोंद केल्या जात असलेल्या गुन्ह्याचे स्वरूप अत्यंत गंभीर आहे. या गुन्ह्याच्या खटल्याला सामोरे जावे लागेल. यासोबतच आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला अनेक देशाकडून व्हिसा नाकारला जातो. शिवाय पासपोर्ट मिळवितानाही अडचणी येण्याची शक्यता आहे. यामुळे पोलिसांकडून लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याचा दाखल होणाऱ्या गुन्ह्याचे गांभीर्य आता तरी लक्षात घ्यायला हवे.