Corona Virus : ट्रम्प यांना दिलेले ‘अँटीबॉडी कॉकटेल’ आता औरंगाबादेतील कोरोना रुग्णांनाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 18:16 IST2021-06-11T18:09:13+5:302021-06-11T18:16:55+5:30
Donald Trump took 'Antibody Cocktail' now available in Aurangabad : कोरोनाची गंभीर लक्षणे उद्भवत असताना हा डोस घेतल्यास यामुळे ऑक्सिजन पातळी कमी होत नाही, असा दावा होतो आहे.

Corona Virus : ट्रम्प यांना दिलेले ‘अँटीबॉडी कॉकटेल’ आता औरंगाबादेतील कोरोना रुग्णांनाही
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोरोनाबाधित असताना त्यांना ‘अँटीबॉडी कॉकटेल’ हे इंजेक्शन देण्यात आले होते. तुम्ही म्हणाल मग यात काय नवीन, मोठ्या व्यक्तींना अशी मिळतातच; पण हेच ‘अँटीबॉडी कॉकटेल’ आता औरंगाबादेतील कोरोना रुग्णांनाही मिळणार आहे. कोरोनाच्या उपचारात आणखी एक नवे औषध शहरात दाखल होत आहे. (Donald Trump took 'Antibody Cocktail' now available in Aurangabad )
कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर दुसऱ्या लाटेत मोठा कहर झाला. कोरोना रुग्णांच्या मृत्यूमुळे आरोग्य यंत्रणाही हतबल झाली. रेमडेसिविरपासून अनेक प्रकारची औषधी आणि उपचार पद्धतींचा आतापर्यंत वापर झाला. औरंगाबादेत कोरोनाचा जोर आता ओसरला आहे. त्यामुळे दिलासा व्यक्त होत आहे; परंतु आजही दोनशेच्या घरात कोरोना रुग्णांचे निदान होत आहे. यात गंभीर प्रकृती होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कायम आहे, अशा गंभीर रुग्णांवर घाटी रुग्णालयात प्राधान्याने उपचार केले जातात. याच घाटी रुग्णालयाला आता ‘अँटीबॉडी कॉकटेल’चे डोस मिळणार आहेत. ‘कॉकटेल’ म्हटले की अनेकांच्या भुवया उंचावतात; परंतु हे ‘अँटीबॉडी कॉकटेल’ आहे. हेच औषध कोरोना झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना देण्यात आले होते. त्यामुळे ते ‘अँटीबॉडी कॉकटेल’ चर्चेत आले होते.
आकडेवारी लपवली नसून योग्य नोंद झाली नाही https://t.co/sVDcjxxRXW
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) June 11, 2021
घाटी रुग्णालयाला याचे ७५० डोस देण्यात येत आहेत. अँटीबॉडी कॉकटेल हे काही दिवसांपूर्वीच भारतात दाखल झाले आहे. अँटीबॉडी कॉकटेलचा वापर सौम्य ते मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांसाठी केला जाऊ शकतो. कोरोनाची गंभीर लक्षणे उद्भवत असताना हा डोस घेतल्यास यामुळे ऑक्सिजन पातळी कमी होत नाही, असा दावा होतो आहे. हे कॉकटेल कॅसिरिव्हीमॅब आणि इम्डेव्हिमॅब या दोन औषधींपासून बनलेले असल्याचे घाटीतील तज्ज्ञांनी सांगितले.
सौम्य ते मध्यम स्वरूपातील रुग्णांना फायदा
सौम्य ते मध्यम स्वरूपातील कोरोना रुग्णांना रोश कंपनीचे ‘अँटीबॉडी कॉकटेल’ हे औषध देता येईल. यामुळे रुग्णाची प्रकृती गंभीर होण्यापासून रोखले जाते, असे सांगण्यात येते. घाटी रुग्णालयाला याचे ७५० इंजेक्शन मिळाले असून, मुंबईहून शनिवारपर्यंत ते घाटीत दाखल होतील.
-डाॅ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी), औरंगाबाद
घाटीत दाखल रुग्ण
एकूण कोरोना रुग्ण- १८६
सामान्य स्थिती-४७
गंभीर स्थिती-१३९