Corona Virus : नियतीची क्रुरचेष्टा ! एकाचे अंत्यसंस्कार करायचे आणि दुसऱ्यासमोर खोटे हसायचे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 12:48 IST2021-05-24T12:45:11+5:302021-05-24T12:48:06+5:30
Corona Virus : आता जो आहे तो तरी सुखरूप घरी यावा म्हणून मग मुलांना दु:ख गिळून, आनंदीपणाचा मुखवटा वावरून फिरावे लागत आहे.

Corona Virus : नियतीची क्रुरचेष्टा ! एकाचे अंत्यसंस्कार करायचे आणि दुसऱ्यासमोर खोटे हसायचे...
औरंगाबाद : कोरोनाने इतकी भयंकर वेळ आणली आहे की, आई - वडिलांपैकी एकाचे निधन झाल्यावर त्यांचे अंत्यसंस्कार करायचे आणि जो जिवंत आहे, त्याच्यापासून हे एवढे मोठे दु:ख लपवून ठेवायचे. वेळप्रसंगी त्याच्यासमोर खोटे हसायचे, तुमच्या दोघांच्याही प्रकृती सुधारत आहेत, तुम्ही लवकरच एकमेकांना भेटाल, असे मनावर दगड ठेवून सांगायचे आणि वेळ मारून न्यायची. नियतीने केलेली ही अशी क्रूरचेष्टा आज कोरोनामुळे अनेकांच्या वाट्याला येत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना अशा अतिभयंकर प्रसंगातून जावे लागत आहे. वृद्ध आई - वडिलांना कोरोना झाला की, दोघांनाही दवाखान्यात ठेवावे लागते. यापैकी अनेक जण मधुमेह, रक्तदाब किंवा वार्धक्यामुळे होणाऱ्या इतर आजारांनी कृश झालेले असतात. ते कोरोनाच्या तावडीत चटकन सापडतात. योग्य आणि वेळेत उपचार मिळाले तरी कोरोनावर मात करण्यात अपयशी ठरतात आणि मृत्यू ओढवतो. पण त्याच वेळी त्यांचा जोडीदार मात्र त्यांच्यासारख्याच परिस्थितीतून जात असतो. कोरोनामुळे प्रकृती अधिकच नाजूक झालेली असते. पण ती लवकरच सुधारेल, अशी आशा डॉक्टरांनाही असते. अशा नाजूक स्थितीत आपल्या जोडीदाराचे असे अनंताच्या प्रवासाला निघून जाणे त्यांना अजिबातच झेपणारे नसते. त्यामुळे जोडीदाराच्या निधनाबाबत आताच काहीही कळू देऊ नका, कारण हा आघात पचविण्यासाठी त्यांचे शरीर त्यांना साथ देणार नाही, असे डॉक्टरांनीच सूचविलेले असते. त्यामुळे ज्यांना जायचे होते, ते तर निघून गेले.
आता जो आहे तो तरी सुखरूप घरी यावा म्हणून मग मुलांना दु:ख गिळून, आनंदीपणाचा मुखवटा वावरून फिरावे लागत आहे. आईला गमावले आहे आणि वडील सुधारत आहेत, किंवा वडील गमावले आईची तब्येत सुधारते आहे, अशी परिस्थिती आज अनेक मुलांसमोर ओढवली आहे. जाणारा गुपचूप निघून जातो. पण, जो राहतो त्याच्या प्रश्नांना सामोरे जाणे, अतिकठीण होते. गेल्याचे दु:ख करावे की, दुसऱ्याची प्रकृती सुधारतेय म्हणून समाधान मानावे, हेच अशावेळी कळत नाही, अशी आपबिती काहींनी सांगितली.
आता बाबांना कुठून आणू ?
कोरोनामुळे आई - वडील दोघेही वेगवेगळ्या दवाखान्यात होते. दोघांकडेही मोबाईल असल्याने त्यांचे एकमेकांशी तसेच आमच्याशी फोनवर किंवा व्हिडिओ कॉलद्वारे बोलणे व्हायचे. काही दिवसांनी वडील आयसीयूमध्ये दाखल झाल्याने त्यांना फोनवर बोलणे अशक्य झाले. काही दिवसांतच त्यांनी जगाचा निरोप घेतला. आईची तब्येत सुधारत असली तरीही नाजूकच होती. त्यामुळे तिच्यापासून हे सगळे लपवून ठेवावे लागले. बाबा कसे आहेत, औषधे घेत आहेत ना, मला बोलायचेय त्यांच्याशी, बघायचेय त्यांना. एकदा तरी व्हिडिओ कॉल करून द्या ना, असे आई डोळ्यात पाणी आणून म्हणायची आणि आमचे हृदय पिळवटून निघायचे. आता कसा आणि कुठे व्हिडिओ कॉल करू आणि बाबांना कुठून आणू... असा केविलवाणा प्रश्न विचारत एका जणाने आपल्या भावनांना वाट करून दिली.