Corona Virus : केंद्र सरकारपासून लपले औरंगाबादेतील ५७० कोरोना रुग्णांचे मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 11:35 IST2021-05-18T11:34:24+5:302021-05-18T11:35:43+5:30
Corona Virus:आरोग्य उपसंचालक कार्यालयातील वाॅररूममध्ये पोर्टलवर नोंदणी करण्याचे काम केले जात आहे.

Corona Virus : केंद्र सरकारपासून लपले औरंगाबादेतील ५७० कोरोना रुग्णांचे मृत्यू
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : औरंगाबादेतील तब्बल ५७० मृत्यूपासून केंद्र सरकार अनभिज्ञ असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कारण कोरोनासंदर्भातील पोर्टलवर औरंगाबादेत २ हजार ३५२ मृत्यूची नोंद आहे. प्रत्यक्षात रविवारपर्यंत औरंगाबादेत २ हजार ९२२ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. अँटिजन टेस्ट आणि रुग्णांना रेफर करण्याच्या गोंधळात रुग्णांची नोंदच होत नसल्याची स्थिती आहे. परिणामी, औरंगाबादेतील मृत्यूची गंभीर स्थिती केंद्रापासून लपून रहात असून, त्यातून उपाययोजनांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
आरोग्यासंदर्भातील स्थानिक स्तरावरील माहिती जिल्हा स्तरावरून आरोग्य उपसंचालक कार्यालय, तेथून पुढे राज्य शासनाला माहिती जाते. तर राज्याकडून केंद्राकडे माहिती जाते. कोरोनासंदर्भातील रुग्णसंख्या, मृत्यूची स्थिती स्थानिक पातळीवरून थेट केंद्राला लक्षात यावी, यासाठी पोर्टलवर नोंद करणे गरजेचे ठरते. त्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, महापालिका, घाटी यांना कोरोना रुग्णांची, मृत्यूची नोंद करण्यासाठी पोर्टलचा लाॅगइन आयडी आणि पासवर्ड देण्यात आलेला आहे. परंतु अनेकांकडून ही माहिती भरण्यास अनेक कारणांनी विलंब होत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर कागदोपत्री (मॅन्युअली) कोरोना मृत्यूचे आकडे वेगळे आहेत, तर पोर्टलवरील आकडे वेगळे आहेत. यात तब्बल ५७० रुग्णांच्या मृत्यूचा फरक पडत आहे. स्थानिक पातळीवर जरी ही नोंद असली तर पोर्टलवर नोंदीअभावी केंद्राला त्यासंदर्भात माहिती मिळत नसल्याची स्थिती आहे. परिणामी, औरंगाबादेत मृत्यू कमी असल्याचे कारण पुढे होऊन कोरोना रोखण्याच्या उपाययोजनांकडे केंद्राकडून दुर्लक्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वाॅररूममध्ये नोंदणीवर भर
आरोग्य उपसंचालक कार्यालयातील वाॅररूममध्ये पोर्टलवर नोंदणी करण्याचे काम केले जात आहे. महापालिकेचेही स्वतंत्र वाॅररूम आहे. पाेर्टल म्हणजे एकत्रित रिपोर्टिंग प्रणाली आहे. नोंद झालेल्या रुग्णांच्या मृत्यूची नोंदणी करण्यावर भर दिला जात असल्याचे आरोग्य उपसंचालक स्वप्नील लाळे म्हणाले.
नोंद करण्याची सक्त सूचना
प्रत्येक आरोग्य संस्थेला पोर्टलवर नोंदणी करण्याची सक्त सूचना केली आहे. जिथे रुग्णाचा मृत्यू झाला तेथूनच नोंद होणे गरजेचा आहे. मॅन्युअली आणि पोर्टलवरील संख्येत फरक आहे. परंतु मंत्रालयाला रोज रिपाेर्ट दिला जातो. पोर्टलवरील नोंदी केंद्राला दिसतात.
- डाॅ. जी. एम. कुडलिकर, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी