Corona Virus: एकाच दिवशी ४१० रुग्ण, शहरात कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2022 14:51 IST2022-01-13T14:51:31+5:302022-01-13T14:51:56+5:30
शहराचा पॉझिटिव्हिटी रेट १९.७५ पर्यंत गेला असून दिवसभरात २,११६ टेस्ट करण्यात येत आहेत

Corona Virus: एकाच दिवशी ४१० रुग्ण, शहरात कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट
औरंगाबाद : मागील दहा दिवसांपासून शहरात कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढत होती. बुधवारी बाधित रुग्णांचा अचानक विस्फोट झाला. दिवसभरात तब्बल ४१० बाधित आढळल्याने शहराचा पॉझिटिव्हिटी रेट तब्बल १९.७५ पर्यंत गेला. यामुळे शहरात निर्बंध आणखी वाढू शकतात.
महाराष्ट्र शासनाने कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे रात्रीची संचारबंदी सुरू केली. शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली. दिवसा जमावबंदी आदेश लागू केला. मात्र याचा किंचितही परिणाम झालेला नाही. शहरात कोरोना रुग्णांची संख्या १ जानेवारीपासून वाढतच चालली आहे. बुधवारी महापालिकेने फक्त २,११६ संशयित नागरिकांची तपासणी केली. त्यामध्ये ४१० जण बाधित आढळून आल्याने आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. बाधित आढळून आलेल्या रुग्णांपैकी ३१५ जणांनी होम आयसोलेशनचा मार्ग पत्करला. १५ रुग्ण घाटीत दाखल झाले. ४० जणांनी खाजगी रुग्णालय गाठले. महापालिकेच्या मेल्ट्रॉन हॉस्पिटलमध्ये ४० जणांना भरती करण्यात आले.
शहरात सक्रिय रुग्णांचा आकडा आता १,४९८ पर्यंत पोहोचला आहे. त्यातील १,१०८ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. १० जानेवारी रोजी शहरात २७६ बाधित रुग्ण आढळून आले होते. शहराचा पॉझिटिव्हिटी रेट ११.१२ होता. ११ रोजी २८५ बाधित तर पॉझिटिव्हिटी रेट १२.६९ होता. बुधवारी अचानक रुग्ण संख्या ४१० पर्यंत पोहोचल्याने पॉझिटिव्हिटी रेटने उच्चांक गाठला. १९.७५ एवढा पॉझिटिव्हिटी रेट नोंदविण्यात आला.
महापालिकेकडून जोरदार तयारी
महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दोन दिवसांपूर्वीच नमूद केले होते की शहरात रुग्णसंख्या झपाट्याने वाढणार आहे. दररोज दोन हजारांपर्यंत रुग्णसंख्या जाईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यादृष्टीने महापालिकेने कोविड सेंटर आणि ऑक्सिजन असलेले बेड तयार ठेवलेले आहेत.